शहराचा मध्यवर्ती आणि अंबाबाई मंदिराचा बाह्यपरिसर असलेल्या तटाकडील तालीम प्रभागात सर्व बाजूंनी वाहतुकीच्या कोंडीचा मोठा प्रश्न आहे. प्रभागात रस्त्यांची बऱ्यापैकी कामे झालेली आहेत. असे असले तरी आदर्श शाळेच्या मागील चॅनेलची दुरवस्था आहे. बाजारपेठ, पर्यटकांचा ओढा, यात्री निवास आणि रहिवासी वस्ती अशा सगळ्या कचाट्यात अडकलेल्या प्रभागात बाजारपेठ असल्याने रस्त्यांवर गर्दी खूप असते. त्यातच फेरीवाले भाजीवाल्यांनीच रस्ता व्यापलेला असतो. त्याचा वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. तटाकडील तालीम या प्रभागात तटाकडील तालीम, अपना बँकेच्या समोरची बाजू, उभा मारुती चौक, सर्वेश्वर मंदिर, महाकाली मंदिर, दयावान कमानीची पूर्व बाजू, साकोली कॉर्नर, ब्रह्मेश्वर पार्क, रंकाळा स्टँड, आयरेकर गल्ली, पिशवीकर हॉस्पिटलसमोरची बाजू, बाजारबोळ, बाबूजमाल दर्गा कमान, परांडेकर हॉस्पिटल, महालक्ष्मी धर्मशाळा, जनता बझार समोरची बाजू हा परिसर येतो. प्रभागाची लोकसंख्या ६ हजार ६०० इतकी आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या या प्रभागात बहुतांशी मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे. विद्यमान नगरसेविका प्रभा टिपुगडे या प्रभागातील २५ वर्षांची मक्तेदारी मोडून काढत भाजपमधून पहिल्यांदाच निवडून आल्या. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही त्यांनी भागात केलेली विकासकामे उल्लेखनीय आहेत. असे असले तरी अंबाबाई मंदिर, रंकाळा स्टँड आणि गंगावेश अशा तीन परिसरात विभागणी झाल्याने या प्रभागावर पर्यटकांचा, वाहतुकीचा मोठा ताण आहे. शिवाय आदर्श शाळेच्या मागील चॅनेलचे काम बरेच वर्षे रखडले आहे. या प्रश्नी वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन त्याची दखल घेत नाही. या प्रभागाला गरजांच्या तुलनेत विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीची कमतरता आहे. परिसरात महापालिकेची एकही शाळा किंवा विरंगुळ््यासाठी बाग-बगीचा नाही. काही गल्ल्यांमध्ये रस्ते व गटर्स होणे बाकी आहे. मात्र, नगरसेविकांचा प्रभागात चांगला जनसंपर्क असल्याचे जाणवले. नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दाद घेतली जाते. पूर्वी परिसरात रस्ते, ड्रेनेज, गटर्स, धूर फवारणी अशी मूलभूत कामेही झालेली नव्हती. निवडून आल्यानंतर मी त्या कामांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आजवर ९० टक्क्यांहून अधिक विकासकामे करू शकले. मध्यवर्ती ठिकाण असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे; पण अंबाबाई मंदिर विकास आराखड्यानंतर यात फरक पडेल अशी अपेक्षा आहे.- प्रभा टिपुगडे, नगरसेविका
फेरीवाले, भाजीवाल्यांचा अडथळा
By admin | Updated: March 16, 2015 00:07 IST