दीपक मेटील - सडोली खालसा देशात अनेक योजना, दारिद्र्यरेषेखालील यादी तयार करण्यासाठी व अन्य योजनांचे लाभार्थी निवडण्यासाठी राज्य शासनाने सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना सन २०११ साली सर्वेक्षण केले; परंतु शासनाच्या आंधळ्या कारभारामुळे गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथील निम्मे गावच प्रारूप यादीमधून गहाळ झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. याबाबत विचारणा केल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनीही हात वर केल्याने याची दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये करवीर पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय मुळीक यांच्यासह सुमारे १०० कुटुंबेच गायब झाली आहेत. जनगणनेसाठी शासनाने नियुक्त केलेले प्रगणक घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींची संख्या, जात, व्यवसाय, वाहन अशा अनेक बाजूंनी चौकशी करून सर्वेक्षण केले. गाडेगोंडवाडी गावचे २०११ साली आर्थिक, सामाजिक, जनगणेअंतर्गत सर्वेक्षण झाले. याची प्रारूप यादी गत आठवड्यात ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करून याबाबत गावात दवंडी दिली. त्यानंतर गावातील अनेक कुटुंबातील नावे गायब झाल्याचे निदर्शनास आले. गाडेगोंडवाडीची लोकसंख्या ११२९ आहे, तर यामध्ये सुमारे ४५० ते ५०० कुटुंबांचा समावेश आहे. यामध्ये पुरुष ६३५, तर महिला ४९४ आहेत. यापैकी सुमारे १०० कुटुंबांतील सुमारे ४५० ते ५०० ग्रामस्थांची नावे जनगणना प्रारूप यादीतून गायब झाली आहेत.ग्रामस्थांची महसूल व अन्य अधिकाऱ्यांना याविषयी विचारणा केली; परंतु त्यांनीही हात वर केल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने व ग्रामसेवक यांनी यादीमध्ये नावे समाविष्ठ करण्यासाठी फॉर्म भरून घेतले आहेत. प्रारूप यादीतून निम्मे गावच गायब झाल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. जनगणनेचे फेर सर्वेक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. सन २०११ साली जगगणना झाली व त्याची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये सावळागोंधळ आहे. हा गोंधळ कुणामुळे झाला आहे याची चौकशी करावी. वंचित कुटुुंबांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - सुरेखा मुळीक, सरपंचगाडेगोंडवाडी गावातील सुमारे ४०० ते ५०० ग्रामस्थांची नावेच जनगणना यादीत समाविष्ठ नाहीत. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळेनासा झाला आहे. शासनाने याचे फेरसर्वेक्षण करावे व गायब झालेली नावे समाविष्ट करावीत. - शामराव चौगले, ग्रामस्थ, गाडेगोंडवाडी
निम्मे गाडेगोंडवाडीकर गायब
By admin | Updated: March 16, 2015 00:08 IST