कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर शहरात अनेकांना दोन घास मिळणे अवघड झाले आहे. ते लक्षात घेऊन असेंब्ली रोड आणि नागाळा पार्कमध्ये राहणाऱ्या चार महाविद्यालयीन युवती या अशा दोनशे गरजूंना रोज अल्पोपाहार, चहा-बिस्किटे वाटप करत आहेत. स्वत:च्या पॉकेटमनी आणि त्यांच्या परिसरातील काही नागरिकांच्या आर्थिक मदतीवर हा उपक्रम त्या राबवित आहेत.
कोरोनाचा सध्याचा काळ अधिक कठीण आहे. अशा स्थितीत समाजातील गरजूंना आपल्या परीने काही मदत करण्याचा विचार असेंब्ली रोड परिसरात राहणाऱ्या नूपुर देशपांडे, श्वेता काळुगडे, दिशा मनचुडिया आणि नागाळा पार्कमध्ये राहणाऱ्या गुंजन नाडकर्णी यांच्या मनात आला. त्यांनी शहरातील गरिबांना आणि लॉकडाऊनमध्ये विविध रस्त्यांवर बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना अल्पोपाहार, चहा, बिस्किटे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारपासून त्यांनी सुरुवात केली. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानक, स्टेशन रोड, रंकाळा तलाव, व्हिनस कॉर्नर, कसबा बावडा आदी परिसरातील पोलीस आणि गरीब अशा दोनशे जणांना कधी पोहे, कधी उप्पीट, तर पुलाव, केळी, चहा, बिस्किटांचे वाटप करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचा हा मदतीचा हात अनेक भुकेलेल्यांना दोन घास देण्याचे काम करत आहे.
चौकट
मदतीचा हात देईल बळ
या उपक्रमासाठी रोज सुमारे १५०० रुपये खर्च होत आहेत. हा खर्च त्या युवती आपल्या पॉकेटमनी आणि त्या राहत असलेल्या परिसरातील काही नागरिकांनी केलेल्या आर्थिक मदतीवर करत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीचा हात दिल्यास या ‘हंगर हेल्पर’च्या उपक्रमाला बळ मिळेल.
प्रतिक्रिया
मास्क, ग्लोव्हज, सॅॅॅनिटायझर, फेसशिल्डच्या वापरासह कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून आम्ही रोज अल्पोपाहार, चहा-बिस्किटांचे वाटप करत आहोत. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम आम्ही राबविणार आहोत.
-नूपुर देशपांडे.
फोटो (१८०५२०२१-कोल-हंगर हेल्पर फोटो) : कोल्हापुरातील महाविद्यालयीन युवती नूपुर देशपांडे, श्वेता काळुगडे, दिशा मनचुडिया, गुंजन नाडकर्णी या ‘हंगर हेल्पर’ ग्रुपच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना रोज अल्पोपाहार, चहा-बिस्किटांचे वाटप करत आहेत. (छाया : नसीर अत्तार)
===Photopath===
180521\18kol_1_18052021_5.jpg
===Caption===
फोटो (१८०५२०२१-कोल-हंगर हेल्पर फोटो) : कोल्हापुरातील महाविद्यालयीन युवती नुपुर देशपांडे, श्र्वेता काळुगडे, दिशा मनचुडिया, गुंजन नाडकर्णी या ‘हंगर हेल्पर’ ग्रुपच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीसांना रोज अल्पोपहार, चहा-बिस्कीटांचे वाटप करत आहेत. (छाया : नसीर अत्तार)