लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : किणी (ता. हातकणंगले) येथे दलित वस्तीत केलेल्या कामाची १० टक्के रक्कम तात्काळ मिळावी यासाठी ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसेवकांस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच शासकीय दप्तरची नासधूस, दमदाटी केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. हा मारहाणीचा प्रकार शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रवीण काकासाहेब कुरणेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकारी विजयकुमार तुकाराम पंडित (वय ५५, रा. हिरवडे खालसा, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी करीत आहेत.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी : किणी येथील ग्रामपंचायत सदस्य कुरणे हे सकाळी साडे अकराच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी ग्रामविकास अधिकारी पाटील यांच्याकडे दलित वस्तीत केलेल्या कामाचे १० टक्क्यांनी ५० हजार रुपयांचा चेक आताच द्या यासाठी आग्रह करत होते. याबाबत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पैसे जमा झालेले आहेत. खात्यावर किती रक्कम आहे, यांची खात्री करून चेक देतो, असे सांगितले.
दरम्यान प्रत्येक वेळेस असेच करता असे म्हणत कुरणे याने पाटील यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच शासकीय दप्तरची नासधूस केली. पाटील यांनी आरडा-ओरड केल्यानंतर अमोल धनवडे, रवी कुरणे यांनी सोडविले. या घटनेनंतर तालुक्यातील ग्रामसेवक एकत्रित वडगाव पोलीस ठाण्यात आले होते.