सावरवाडी : राज्यातील शाहिरी कलेला राजाश्रय देण्यासाठी ग्रामीण जनतेचा पुढाकार महत्त्वाचा आहे. लोककलेला नव्या बदलत्या युगात प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले.कसबा बीड (ता. करवीर) येथे कवी शंकरनाथ बीडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भेदिक शाहीर व राष्ट्रीय शाहिरी पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ‘सुरभी’चे संस्थापक प्रा. आनंद गिरी होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण सभापती मनीषा सूर्यवंशी म्हणाल्या, शाहिरी कलेतून समाजाचे प्रतिबिंब उलघडते. त्यासाठी शौर्याची परंपरा जोपासणाऱ्या शाहिरी कलेची जपणूक होणे आवश्यक आहे. प्रा. आनंद गिरी म्हणाले, दिवसेंदिवस शाहिरी कला लोप पावत चालली असून, लोककलेचे प्रभावी माध्यम म्हणून शाहिरी कला जोपासणे आवश्यक आहे.यावेळी विकास पाटील, महेश कदम, शिवाजी वरेकर, रंगराव शिंदे, जयवंत रणदिवे, बाळासाहेब पाटील, विजय जाधव, किसनराव किळवणकर, प्रा. सर्जेराव टिपुगडे, आदी शाहिरांना अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.शाहीर शहाजी माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच सुवर्णा सूर्यवंशी, शरद मोरे, आदींची भाषणे झाली. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले, तर पंढरीनाथ मोरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
शाहिरी कला टिकविण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे : महाडिक
By admin | Updated: November 26, 2014 00:07 IST