सतीश पाटील -शिरोली--‘गोकुळ’च्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी या दोन्ही गटांनी हातकणंगले तालुक्याला वगळले आहे. या तालुक्याला गेल्या वीस वर्षांपासून ‘गोकुळ’चे संचालक पदच नाही.कोल्हापूर जिल्हा दूध संघ ‘गोकुळ’ची पंचवार्षिक निवडणूक लागली असून, या निवडणुकीत गटा-तटाच्या राजकारणांपासून कायम विरोधी असणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनीही पक्ष बाजूला ठेवून ‘गोकुळ’मध्ये प्रवेश करण्यासाठी सत्तारूढ गटातील आमदार महादेवराव महाडिक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशी तसेच विरोधी गटातील माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व विनय कोरे यांच्याशी सोयरीक जोडली आहे आणि त्यांनाच या निवडणुकीत उमेदवारी मिळाली आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांत ‘गोकुळ’चे सभासद असून, बारापैकी दहा तालुक्यांत गोकुळसाठी दोन्ही गटांनी उमेदवार दिले आहेत. त्यात एकीकडे करवीर तालुक्यात सत्ताधारी गटाकडून चार, तर विरोधी गटाकडून पाच उमेदवार दिले आहेत, तर दुसरीकडे हातकणंगले व गगनबावडा या दोन्ही तालुक्यात एकही उमेदवार दिलेला नाही. दोन्ही गटांनी हातकणंगले तालुक्याला डावलले आहे.हातकणंगले तालुक्याला वीस वर्षांपूर्वी शेवटचे संचालकपद मिळाले होते. सध्या हातकणंगले तालुक्यात ७६ सभासद आहेत, तर दररोज गाईचे व म्हशींचे मिळून ५० हजार लिटर दूध गोकुळला जाते, पण तरीही हातकणंगले तालुक्याला उमेदवारी मिळालेली नाही. यावेळी सत्तारूढ गटाचा सभासद मेळावा शिरोलीत झाला होता. त्या मेळाव्यातही सभासदांनी हातकणंगले तालुक्याला एक उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती. अनेक संचालकांनी त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही भाषणात सांगितले होते. निवडणुकीचे अर्ज भरतानाही अनेकांनी अर्ज भरले होते, पण प्रत्यक्षात हातकणंगले तालुक्याला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पुन्हा पाच वर्षे संचालकपदासाठी तालुक्याला प्रतीक्षेत बसावे लागले आहे.आमच्या गटाकडे हातकणंगले तालुक्यातून कोणीही उमेदवारी मागितली नाही. हातकणंगलेऐवजी शिरोळमधून उमेदवारी पुढे आल्याने आम्ही शिरोळमधूनच उमेदवार दिला आहे. हातकणंगलेमधून कोणी इच्छुक असते, तर उमेदवारी दिली असती. गोकुळमध्ये नाराज गटाचा आम्हाला चांगला फायदा होणार आहे.- सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री.हातकणंगले तालुक्यात एकूण ७६ सभासद आहेत. दोनशेपेक्षा कमी सभासद असणाऱ्या तालुक्याला संचालकपद नाही. त्यामुळे हातकणंगले व शिरोळ मिळून एकच उमेदवार दिला आहे आणि ‘गोकुळ’मध्ये सत्ताधारी गटालाच सभासद निवडून देतील, यात शंका नाही.- महादेवराव महाडिक, आमदार
हातकणंगलेला वीस वर्षांपासून ‘गोकुळ’ची हुलकावणी
By admin | Updated: April 10, 2015 23:47 IST