राजाराम लोंढे / कोल्हापूर ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’पाठोपाठ बाजार समितीतही दोन्ही काँगे्रसच्या ‘आघाडीचा फॉर्म्युला’ कायम राहण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत आपआपली संस्थाने ताब्यात ठेवत शिवसेना-भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी बाजार समितीतही खेळली जाऊ शकते. त्यादृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंधरा वर्षे राज्यात व दहा वर्षे केंद्रात सत्तेत राहत सहकारी संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांविरोधात शड्डू ठोकले. सरकारमध्ये सत्तेत पण इतर निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्येच कायम कुस्ती करत प्रत्येकाने आपआपली संस्थाने ताब्यात ठेवली. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसचे पानिपत झाले आणि युती सत्तेवर आली. संस्थात्मक पातळीवर युतीची ताकद नसली तरी सरकार हातात असल्याने दोन्ही काँग्रेसची गोची झाली. सरकारची ताकद वापरून प्रत्येक संस्थेत प्रवेश करण्याचा मनसुभा शिवसेना- भाजपचा आहे पण त्यांना संधी दिली तर आगामी सर्वच निवडणुकीत ती डोकेदुखी ठरू शकते, यासाठीच दोन्ही काँग्रेस नेत्यांनी सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच ‘गोकुळ’मध्ये काँग्रेसला बाय, जिल्हा बॅँकेत राष्ट्रवादीला बाय देऊन पद्धतशीरपणे युतीला बाजूला ठेवले. बाजार समितीसाठी येत्या आठ-दहा दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. समितीची निवडणूक शिवसेना-भाजपने ताकदीने लढविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. ‘गोकुळ’, जिल्हा बँकेप्रमाणे येथेही आघाडी करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड व कागल असे साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. गेल्यावेळेला दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढली होती, त्यावेळी राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षाला १९ पैकी १७ जागा मिळाल्या होत्या. कॉँग्रेसला पणन प्रक्रिया व अडते-व्यापारी गटातील एक अशा दोन जागा मिळाल्या. विकास संस्था गटात अकरा जागा आहेत, येथे करवीरवगळता राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाची ताकद आहे. ग्रामपंचायत गटात चार जागा आहेत, यासह पणन प्रक्रिया संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. अडते-व्यापारी, हमाल-तोलाईदार गटातील तीन जागा या पक्षापेक्षा व्यक्तीवर अवलंबून आहे. एकंदरीत विकास संस्था, ग्रामपंचायतमधील ताकद पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जनसुराज्य पक्ष एकत्र आले तर विरोधकांच्या हातात फारसे लागणार नाही हे निश्चित आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.
‘गोकुळ’, ‘केडीसीसी’तील फॉर्म्युला बाजार समितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2015 01:07 IST