हुपरी : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील ‘सिल्व्हर झोन’ वसाहत व हुपरी परिसरात असणाऱ्या गावांमधील सरकारी गायरान क्षेत्रांमध्ये चांदी उद्योगासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक व माजी सरपंच दिनकरराव ससे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. निवेदनात म्हटले आहे, चांदी कारखानदार असोसिएशन ही संस्था चांदी हस्तकला व्यवसायासाठी विविध कार्ये करणारी मातृसंस्था आहे. उद्योजकांना चांदी व्यवसायामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडीअडचणी सोडविणे, व्यवसायाच्या विकासासाठी योग्य त्या योजनांचा पाठपुरावा करून त्या राबविणे, आदी कामे केली जातात. हा व्यवसाय हुपरीपुरता मर्यादित न राहता शेजारच्या गावांमध्येही विकसित झाला आहे. यापूर्वी चांदी हस्तकला उद्योग एकत्रित सुरक्षित राहावा यासाठी शासनाने पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये निवासी कम उद्योग सुविधेचा ‘सिल्व्हर झोन’ विकसित करून त्याठिकाणी २५० एकर जागा दिलेली आहे. मात्र, त्यापैकी निम्मेच क्षेत्र विकसित करून उद्योजकांना भूखंड दिले आहेत. उर्वरित क्षेत्राचा विकास करून तेथील भूखंड उद्योजकांना मिळणे गरजेचे आहे. तसेच परिसरातील यळगूड, रेंदाळ, तळंदगे, रांगोळी, जंगमवाडी या गावांतील शासकीय मालकीची गायराने विनावापर पडून आहेत. त्याठिकाणी सिल्व्हर झोन वसाहतीप्रमाणे निवासी कम उद्योग सुविधेच्या वसाहती उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करून मिळाव्यात. त्यामुळे रोजगार निर्मिती झाल्याने बेरोजगारीच्या समस्येस आळा बसण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
हुपरी परिसरात चांदी उद्योगासाठी जागा द्या
By admin | Updated: August 22, 2014 00:52 IST