सांगली : सध्या साखरेचा दर ३१०० रुपये क्विंटल झाला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी दि. ३१ जानेवारीअखेर एकरकमी एफआरपीची द्यावी, अन्यथा दि. १ फेब्रुवारीला कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले की, ऊस गाळपास गेल्यानंतर चौदा तासात साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार सर्व रक्कम देणे बंधनकारक आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण समिती गठित केली आहे. या समितीच्या तीन बैठका झाल्या असून त्यामध्ये क्षेत्रीय यांनी कायद्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: कायदेतज्ज्ञ असूनही, त्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करून कायदा मोडला आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्णासह राज्यातील काही साखर कारखान्यांनी तोडणी व वाहतुकीचा बोगस खर्च दाखवून एफआरपीच कमी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. कारखान्याच्या या प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषी कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे. सध्या साखरेचा दर ३१०० रुपये क्ंिवटल झाला आहे. एक टन उसापासून १२० किलो साखर तयार होत असून, त्यापासून ३७२० रुपये कारखानदारांकडे उपलब्ध होत आहेत. याशिवाय बगॅस आणि मोलॅसिसपासून टनामागे ७०० रुपये उपलब्ध होणार आहेत. एक टन उसापासून कारखान्याला सुमारे ४४०० रुपये मिळणार आहेत. बँक आणि कारखान्याकडील उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांना देण्यासाठी कारखान्याकडे ३१०० रुपये शिल्लक राहत आहेत. कारखानदारांनी ती दि. ३१ जानेवारीपर्यंत दिली पाहिजे, अन्यथा दि. १ फेब्रुवारीपासून शंखध्वनी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
'एकरकमी एफआरपी द्या, अन्यथा अध्यक्षांच्या घरासमोर शंखध्वनी
By admin | Updated: January 20, 2016 01:19 IST