कोल्हापूर : तुम्ही पॅकेज किंवा मदत म्हणा, पूरग्रस्तांना मदत देण्यात आधीच उशीर झालाय. तेव्हा जे काही द्यायचं आहे ते तातडीने जाहीर करा, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती पाहिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
गेल्यावेळच्या आणि आत्ताच्या पावसाची आकडेवारी सांगून फडणवीस म्हणाले, कोल्हापूरची अवस्था बशीसारखी झाली आहे. त्यामुळे या पुराकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. त्यासाठी दीर्घकालीन उपायोजनांची गरज आहे. २०१९ला आम्ही पूरग्रस्तांना तातडीने आधी पाच हजार तर नंतर दहा हजार रुपये दिले, व्यापाऱ्यांना निधी दिला. आता वीज मीटरसाठी पुन्हा अनामत मागत आहेत. आम्ही ती मागितली नव्हती तर वीज खात्याच्या खर्चाने मीटर दिले होते. आता असेच निर्णय हाेण्याची गरज आहे.
पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी आम्ही योजना तयार केली होती. दि. २५ सप्टेंबर २०१९ला जागतिक बॅंकेने या प्रकल्पासाठी साडेतीन हजार कोटी रुपये देण्याचे मान्यही केले. परंतु, आमचे सरकार गेले आणि हा प्रकल्प राहिला. या प्रकल्प पुढे नेला पाहिजे. ज्या घटकांना पुराचा फटका बसला आहे, त्यांना कमी व्याजाने कर्ज दिले पाहिजे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश आवाडे, धनंजय महाडिक, अमल महाडिक, समरजित घाटगे, राहुल चिकोडे, महेश जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
फडणवीस म्हणाले
१ केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय अधिकारी नेमावा.
२ २० वर्षांपूर्वीची बांधकामे तोडून उपयोग नाही, नव्याने होऊ नयेत यासाठी कडक अंमलबजावणी करावी.
३ पूर अडविण्यासाठी सरसकट भिंत बांधून चालणार नाही.
४ पूरग्रस्तांचे कर्ज माफ करावे.
५ कुंभार समाजाला नुकसानभरपाई मिळावी.
चौकट
ही मूल्यमापनाची वेळ नव्हे
पूरस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले का? या प्रश्नावर ही वेळ मूल्यमापनाची नाही. पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, याला आमचे प्राधान्य आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.