कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील एमआयडीसीसाठीच्या ३५० हेक्टर जागेची अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून सविस्तर प्रस्ताव द्यावा, अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिल्या. खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात याबाबत बैठक झाली. या बैठकीला मंत्री सामंत ऑनलाइन उपस्थित होते.शाहूवाडी तालुक्यातील अरुळ, आंबर्डे, करंजोशी, सावे, बजागेवाडी व शित्तुर तर्फ मलकापूर या गावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे एमआयडीसी मंजूर झाली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांची मागणी पाहता, अरुळ, आंबर्डे, करंजोशी, सावे, बजागेवाडी व शित्तुर तर्फ मलकापूर या पाच गावांतून सुमारे ३५० हेक्टर जागा उपलब्ध आहे. ही जमीन देण्याबाबत ग्रामस्थांनीही सकारात्मकता दर्शवली असल्याचे खासदार माने आणि आमदार कोरे यांनी सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. या ठिकाणी आयटी पार्क, चर्म उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग अशा विविध उद्योगांची निर्मिती होऊ शकते. यामुळे शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीचा मार्ग खुला होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली.शाहूवाडीत एमआयडीसी उभारण्याची मागणी खासदार माने आणि आमदार कोरे यांनी केली होती. या भागातील युवकांना रोजगार मिळावा, तसेच येथील नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी औद्योगिक विकासाची गरज असल्याचे यावेळी या दोघांनीही स्पष्ट केले. बैठकीला उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगान, सहायक व्यवस्थापक डॉ. विनय राठोड, डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, किरण जाधव, संतोष भिंगे व उमेश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील (पेरीडकर) उपस्थित होते.
Kolhapur: शाहूवाडी एमआयडीसीसाठी ३५० हेक्टरचा प्रस्ताव द्या, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:07 IST