लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये पायाच्या दुखापतीवर उपचार घेतलेल्या सुवर्णा येळवणकर ही वयोवृद्ध माऊली घरी परतण्यासाठी लेकीची वाट पाहत आहे. नात्यातील व्यक्तीने त्यांना दवाखान्यात दाखल केले. उद्या येते असे सांगणारी लेक गेली दीड महिना त्यांना न्यायला आलेली नाही. लेकीनेच आईकडे पाठ फिरवल्याने आता या माउलीला ठेवायचे कुठे, असा प्रश्न महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय प्रशासनाला पडला आहे. स्वत:च्या हाताने मुलीला खाऊ घालून वाढवलेल्या या माउलीच्या नशिबी आता शेजारील रुग्णांच्या राहिलेल्या अन्नावर जगण्याची वेळ आली आहे. तिला आसरा देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.
बातमी लिहितानाही पोटात कालवाकालव व्हावी असा प्रसंग या माउलीच्या नशिबी आला आहे. शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीत सुवर्णा येळवणकर या मैत्रिणीच्या घरी आश्रयाला होत्या. जवळच्या दवाखान्यात स्वच्छतेचे काम करून त्या पोट भरायच्या. वयोमानानुसार कामही सोडावे लागले. आता निराधार योजनेतून मिळणाऱ्या पैशांवर त्या कशा-बशा जगतात; पण ११ जुलैला पडण्याचे निमित्त झाले आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. लांबच्या पाहुण्याने मदत म्हणून त्यांना सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्लास्टर घातल्यावर आठवडाभर त्यांनी त्यांची देखभाल केली; पण पुढे त्यांनाही जमेना. शेवटी त्यांनीच सुवर्णा यांच्या जयसिंगपूर येथील विवाहित मुलीशी संपर्क साधला; पण तिने आईला नेण्यास नकार दिला. तेव्हापासून गेली दीड महिना कोणीही या महिलेला नेण्यासाठी आलेले नाही.
रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या पाहुण्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, त्या राहत असलेल्या मैत्रिणीच्या घराजवळ नेण्यात आले; पण तिथे आता कोणीच राहत नाही, ही मैत्रीण घर सोडून भोगावतीला निघून गेल्याने त्यांना परत रुग्णालयामध्ये आणले गेले. पोलिसांनी मुलीची भेट घेऊन तिला आईला न्यायला सांगितले. रुग्णालयाच्या प्रशासनाला बेड कमी पडत असून इतर रुग्णांना त्याची गरज आहे.
------------
फोटो नं २१०८२०२१-कोल-सुवर्णा येळवणकर
ओळ : कोल्हापुरातील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सुवर्णा येळवणकर लेकीच्या वाटेकडे असे डोळे लावून बसल्या आहेत. (छाया : आदित्य वेल्हाळ)
---