संजय पाटील - कऱ्हाड कुख्यात गुंडांकडेच ‘रिव्हॉल्व्हर’ असतात, असा आजपर्यंतचा समज; पण कऱ्हाडला गल्लीबोळात दादागिरी करणाऱ्यांनीही आता ‘खटक्यावर बोट’ ठेवलंय. मोबाईलच्या किमतीत गावठी कट्टा उपलब्ध होत असल्याने अनेकजण ‘कट्टा’ खरेदीच्या भानगडीत पडलेत. त्यातील काहीजणांना पोलिसांनी ‘गळ’ लावलाय. मात्र, अनेकजण अद्यापही पोलिसांच्या गळाला लागले नाहीत. गावठी कट्ट्याच्या या तस्करीचे ‘कनेक्शन’ परराज्यात असल्याने त्याची पाळेमुळे खोदण्यात पोलिसांनाही यश येत नसल्याचे चित्र आहे. शिराळ्यात बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या निलेश पाटील या युवकाला रविवारी सांगली पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. निलेश पाटील हा सध्या शिराळ्यात वास्तव्यास असला तरी तो मुळचा कऱ्हाड तालुक्यातील आटके गावचा. त्यामुळे पुन्हा एकदा गावठी कट्ट्याचा ‘धागा’ कऱ्हाडपर्यंत पोहोचला. यापुर्वीही गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी इतर जिल्ह्यात कारवाई करून अटक करण्यात आलेल्या आरोपींचे धागेदोरे कऱ्हाडपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे गावठी कट्ट्याच्या तस्करीचे कऱ्हाडशी असणारे लागेबांधे स्पष्टझालेत.मुळात कऱ्हाड हे संवेदनशिल शहर. गुन्हेगार आणि गुन्हेगारी या शहरासाठी नविन नाही; पण गत काही वर्षापासुन ‘रिव्हॉल्व्हर’ तस्करीशी या शहराचा जवळून संबंध येतोय. तस्करी करणारे परराज्यातील असले तरी या तस्करीला शह देणारे दलाल स्थानिकच. त्यामुळे तस्करीचे एखादे प्रकरण उघडकीस आले तरी परप्रांतीय तस्कर पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार होतात आणि स्थानिक दलाल पोलिसांच्या हाताला लागतात. वास्तविक, कुख्यात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेकांची गुन्हेगारी कारकिर्द कऱ्हाडमधून सुरू झाली आहे. गल्लीबोळात कोणाचेतरी ‘प्यादं’ म्हणून त्यांची ओळख होती; पण सध्या असे गल्लीदादा नामचिन गुंड म्हणून गुन्हेगारी जगतात ओळखले जातायत. शहरात यापूर्वी अनेक गुन्हेगारांकडून पोलिसांनी रिव्हॉल्व्हर हस्तगत केली आहेत; पण सध्या शस्त्राशी संबंधित उघडकीस येणाऱ्या गुन्ह्यांची संख्या धक्कादायक आहे. काही वर्षांपूर्वी रिव्हॉल्व्हर किंवा गावठी कट्ट्याशी संबंधित गुन्ह्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतपत होती. सध्या मात्र एकाच वर्षात असे अनेक गुन्हे उघडकीस येवू लागलेत. त्यातूनच कऱ्हाड रिव्हॉल्व्हर तस्करीचं केंद्र बनत असल्याचं उघड होतय. सहा वर्षात तब्बल ३२ रिव्हॉल्व्हरकऱ्हाडात रिव्हॉल्व्हर व गावठी कट्ट्याशी संबंधित अनेक गुन्हे यापुर्वी उघडकीस आलेत. गत सहा वर्षात उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी ३२ रिव्हॉल्व्हर हस्तगत केल्या आहेत. २००९ साली ११, २०१० साली ५, २०११ साली ३, २०१२ साली २, २०१३ साली ५, २०१४ साली ५ अशा तब्बल ३२ रिव्हॉल्व्हर पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. विद्यार्थीही करतायत ‘डील’रिव्हॉल्व्हर आणि गावठी कट्ट्याची तस्करी करणाऱ्या स्थानिक दलालांमध्ये काही महाविद्यालयीन युवकांचा हात असल्याचे यापुर्वी उघड झाले आहे. पैशाच्या हव्यासापोटी विद्यार्थी या तस्करीत सहभागी होतात. पाच ते दहा हजारात गावठी कट्ट्याची खरेदी करून पुढे त्याची पंधरा ते वीस हजाराला विक्रि केली जाते.परदेशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरकऱ्हाडात यापूर्वी वेब्लेस्कॉड, स्मिथ अँड वेल्सन, लामा या परदेशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर गुन्हेगारांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच गावठी कट्ट्यांचीही खरेदी विक्री होत असल्याचं स्पष्ट झालय. पोलिसांकडून वेळोवेळी तस्करांच्या मुस्क्या आवळल्या जात असल्या तरी दलाल ‘आऊट आॅफ कव्हरेज’ असल्यामुळे या तस्करीची पाळेमुळे खोदण्यात पोलिसांना यश आलेले नाही.रिव्हॉल्व्हरशी संबंधित महत्वाचे गुन्हे१ काही महिन्यापुर्वी विंग, ता. कऱ्हाड येथे छापा टाकून पोलिसांनी आटके येथीलच एकाला गावठी कट्ट्यासह अटक केली होती.२सांगलीतील कुख्यात गुंड सच्या टारझन याला गतवर्षी कऱ्हाड शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. तपासात त्याच्याकडे पाच रिव्हॉल्व्हर पोलिसांना आढळून आली.३ कऱ्हाडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गावठी कट्ट्याच्या तस्करीप्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडून गावठी कट्टेही हस्तगत करण्यात आले होते. ४ विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टा घेवून कऱ्हाडच्या बसस्थानकात आलेल्या युवकालाही काही महिन्यांपुर्वी पोलिसांनी अटक केली होती.५ महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून व सल्या चेप्या हल्ला प्रकरणातील आरोपींकडूनही मोठ्या संख्येने रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आले होती.
मोबाईलच्या किमतीत मिळतोय ‘गावठी कट्टा’
By admin | Updated: March 17, 2015 00:08 IST