कृष्णा सावंत- पेरणोली -आजरा व चंदगड तालुक्यांतील शेतकऱ्यांचा खजिना असलेल्या गावरान आंब्यावर सातत्याने दव्याचा परिणाम होत असल्याने या दोन्ही तालुक्यांतील चवीला मधुर असलेला गावरान आंबा संपुष्टात आला आहे.आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यांतील नैसर्गिक साधनसंपत्ती एकच आहे. तिन्ही तालुक्यांतील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण एकसारखे असल्याने आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. आजरा व चंदगडमधील गावरान आंबा हा चवीला मधुर असल्याने हा आंबा ग्रामीण भागात लोकप्रिय आहे.गत १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून या आंब्याच्या उत्पादनाचे प्रमाण कमी आले आहे. या आंब्याच्या विविध जातींमुळे प्रत्येक आंब्याच्या जातीला वेगळी चव आहे. मात्र, हा आंबा आता नाहीसा होऊ लागल्याने याची चवही नाहीसी झाली आहे. शेतातील प्रत्येक झाडाला शेकडो आंबे लागत असत. परंतु, आता सर्वच झाडे भकास झाली आहेत. दहा-पंधरा वर्षांपूर्वी शेतकरी झाडाखालील आंबे भरून आणण्यासाठी पोती घेऊन जात होता. आता मात्र आंब्याच्या झाडांकडेच बघण्याची वेळ आली आहे. कच्चे आंबे काढून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात अढी घातली जायची. ती अढीही आता नष्ट झाली आहे. या आंब्यामुळे शेतकऱ्याला व ग्रामीण भागातील नागरिकांना पौष्टिक मेवा मिळायचा, तो आता बंद झाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक हातभारही लागायचा, तोही बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी एका चांगल्या आंब्याच्या रानमेव्याला मुकला आहे.आम्हाला लहानपणी शेतातील भरपूर आंबे खायला मिळायचे. परंतु, दरवर्षी दव पडत असल्याने आंब्याचा मोहर गळू लागला आहे. त्यामुळे आंबा नष्ट झाला. यावर शासनाने काही तरी उपाययोजना करण्याची गरज आहे.- चंद्रकांत वंजारी, शेतकरी पेरणोली, ता. आजरा.
गावरान आंबा होतोय ‘दुर्मीळ’
By admin | Updated: May 6, 2015 00:16 IST