शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडचा गणेशोत्सव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:25 IST

राजाराम लोंढेगणेशोत्सव म्हणजे लहानपणी पर्वणी असायची, त्याला कारणेही तशीच होती. पूर्वी गणेशोत्सव काळात शाळेला सुटी नसायची. पाच दिवस शाळेला दांडीच असायची. ज्येष्ठ मंडळी दिवसभर शेतात राबून आली तरी घरातील मंगलमय वातावरणाने त्यांच्या अंगातील कामाचा शीण निघून जायचा. गणेशोत्सवाच्या आठ दिवस अगोदर घरी लगबग सुरू व्हायची. तरुणांची आकर्षक सजावट (आरास) करण्यासाठी ...

राजाराम लोंढेगणेशोत्सव म्हणजे लहानपणी पर्वणी असायची, त्याला कारणेही तशीच होती. पूर्वी गणेशोत्सव काळात शाळेला सुटी नसायची. पाच दिवस शाळेला दांडीच असायची. ज्येष्ठ मंडळी दिवसभर शेतात राबून आली तरी घरातील मंगलमय वातावरणाने त्यांच्या अंगातील कामाचा शीण निघून जायचा. गणेशोत्सवाच्या आठ दिवस अगोदर घरी लगबग सुरू व्हायची. तरुणांची आकर्षक सजावट (आरास) करण्यासाठी गल्लीत स्पर्धा असायची. केळीच्या मोन्यापासून घरातच मंदिर उभे करून मंदिरासमोर सामाजिक प्रबोधनपर, तांत्रिक देखावे उभे करायचे. घराबरोबरच सहकारी संस्था, शाळांमध्येही गणपतीसमोर आकर्षक सजावट केली जायची. सजावट व तांत्रिक देखावे पाहण्याच्या निमित्ताने एकमेकांच्या गाठीभेठी होत; त्यातून विचारपूस व्हायची आणि आपलेपणा वृद्धिंगत व्हायचा, हा यामागील हेतू होता.गणेश चतुर्थीदिवशी तर घरातील सगळ्यांच्या आनंदाला पारावार राहत नव्हता. महिला वर्ग सकाळी लवकर उठून घरातील कामे उरकण्याच्या गडबडीत असायच्या, तर पुरुष मंडळी गणपती आणण्यासाठी एकमेकांना ‘झाली का तयारी?’ असे विचारत. त्यानंतर गल्लीतील सर्वजण एकत्रपणे कुंभारवाड्यात जात आणि टाळ-मृदंगांच्या निनादात गणरायाचे आगमन व्हायचे. फटाक्यांची आतषबाजी होत नव्हती. लहान केपांची पिस्तुले असायची. पिस्तुले मिळाली नाही तर केपांतील माळ दगडावर आपटून वाजवली जायची. पाच हजारांची भलीमोठी फटाक्यांची माळ लावल्यानंतर जेवढा आनंद मिळायचा नाही, तेवढा आनंद केपा वाजवून मिळत होता. केपा उडवत ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर व तितक्याच भक्तिभावात बाप्पांचे जल्लोषात व उत्साही स्वागत केले जायचे. सकाळची आरती झाल्यानंतर सायंकाळी गहू, गूळ आणि त्यात ओल्या नारळाचे खोबरे घालून बनविलेली खीर, मोदकाचा नैवैद्य असायचा. सायंकाळी जेवताना नुसते गव्हाच्या खिरीत कोरे दूध घालून खाण्याचा आनंद काही वेगळाच होता. तिसऱ्या दिवशी गौराईचे आगमन व्हायचे. त्या दिवशी तर घरातील महिला वर्गाची कमालीची लगबग असायची. गौराईला घरात घेऊन तिला सजविण्यासाठी शेजारी-पाजाºयांची ईर्षाच लागायची. सायंकाळी गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जायचा. गल्लीतील प्रत्येक घरातून भाजी-भाकरीची देवाणघेवाण व्हायची. वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या भाज्या, तांदळाच्या भाकरीची गोडी काही औरच होती. आठ दिवस महिला गौरी गीतांनी रात्री जागवायच्या; पण गौरी आल्यानंतर गावातील प्रत्येक तिकटीवर महिला एकत्रित येत. दिवसभर शेतात काम करून कितीही कंटाळा आला तरी जेवण उरकून खेळायला जाण्यासाठी प्रत्येकीची लगबग असायची. झिम्मा-फुगडी, काटवटकणा, घागर घुमविणे, आदी खेळांत महिलांच्या ईर्षा लागायच्या. अस्सल ग्रामीण ढंगात गौरीगीतांत दंग झालेल्या महिलांचे खेळ पाहून डोळ्यांचे पारणे फिटायचे. एरव्ही सार्वजनिक ठिकाणी आपली कला सादर करण्यास आडवी येणारी संस्कृती यावेळी मात्र झुगारली जायची. घरातीलही ज्येष्ठांचीही त्याला आडकाठी नसल्याने माहेरवाशीण पदर खोचून मनमुरादपणे खेळाचा आनंद घ्यायच्या. पाच-सहा दिवस घरातील, गल्लीतील आबालवृद्ध गणेशोत्सवात दंग होऊन जायचे.विसर्जनाचा दिवस आला की मन दु:खी व्हायचे. मंगलमय वातावरणात कधी पाच-सहा दिवस गेले हे कळतच नव्हते. विसर्जनादिवशी जड अंत:करणाने गौरी-गणपती नियोजन करायचे. हमखास पावसाने ओढ दिल्याने खरपाड पडायचे, त्यामुळे उन्हाचा तडाखाही जास्त असायचा. त्यामुळे दुपारनंतर हळूहळू गल्लीतील ज्येष्ठ मंडळी गोळा व्हायची. चार-साडेचार वाजता गणराया घराबाहेर पडायचे. त्याचवेळी गौराई आणि शंकरोबाही विसर्जनासाठी बाहेर निघायचे. महिला वर्ग नटून-थटून गौराई डोक्यावर घेऊन गणपतीबरोबर असायचा. गणराया बाहेर पडले की, लहान मुलांची पिस्तुले आणि केपा बाहेर निघायच्या. घरातील महिलांनी गणरायांच्या पायांवर पाणी घातल्यानंतर तीन वेळा मागे वळून पाहिले की गणराया पुढे सरकायचे. ‘गजानना गजानना, श्रीपाद वल्लभ गजानन....’, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणेश गणेश मोरया’चा जयघोष आणि चिरमुºयांची उधळण करीत नदी, तलावाकडे वाटचाल सुरू व्हायची. विसर्जनाच्या ठिंकाणी शेवटची आरती सामुदायिकपणे आणि एका सुरात व्हायची; त्यामुळे विसर्जन ठिकाणचे वातावरणही भावनिक व्हायचे. नारळ वाढविल्यानंतर त्याचे काढलेले खोबरे व चिरमुरे एकत्रित करून घरी येईपर्यंत वाटेत भेटेल त्याला प्रसाद दिला जायचा. ही कामगिरी लहान मुलांकडे असल्याने उरल्यासुरल्या केपा संपवत भेटेल त्याला प्रसाद देत कधी घर आले हे कळायचे नाही. घरात आल्यानंतर मन सुन्न व्हायचे. पाच दिवस सुरू असलेली लगबग एकदमच थंड झाल्याने मन उदास व्हायचे.