कोल्हापूर : ‘गण गण गणात बोते’ चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक उपक्रमांनी शुक्रवारी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करत पादुकांची मिरवणूक जीपमधून काढण्यात आली.
महाद्वार राेडवरील गजानन महाराज मंदिरात गेल्या सात दिवसांपासून पारायण तसेच भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शु्क्रवारी पहाटे भागातील ज्येष्ठांच्या हस्ते श्रींस अभिषेक करण्यात आला. श्री गजानन महाराज भक्त मंडळाच्यावतीने दरवर्षी भव्य पालखी काढली जाते यंदा मात्र कोरोनामुळे फुलांनी सजवलेल्या जीपच्या बोनेटवर महाराजांच्या पादुका ठेवून मिरवणूक काढण्यात आली. बिनखांबी गणेश मंदिर, अंबाबाई मंदिर, पापाची तिकटी, महापालिका, शिवाजी चौक, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिरामार्गे पुन्हा मंदिर परिसरात पालखीचे विसर्जन झाले. दुपारी भागातील मोजक्याच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब इंगवले, निशांत वाकडे, राहुल इंगवले, ऋषी इंगवले, प्रकाश मिठारी, मोहन पवार उपस्थित होते.
महाद्वार रोडवरील गण गण गणात बोते भक्त मंडळाच्यावतीनेदेखील सकाळी मूर्तीस अभिषेक, आरती व पूजाविधी करण्यात आो. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष अमित माने, उपाध्यक्ष प्रदीप जरग, सचिव शिवनाथ पावसकर, खजानिस गणेश रेळेकर यांच्यासह भाविक व कार्यकर्ते उपस्थित होते. यासह कदमवाडी व पोवार कॉलनी पाचगांव येथील गजानन महाराज मंदिरांतही धार्मिक उपक्रम घेण्यात आले.
--
फोटो नं ०५०३२०२१-कोल-गजानन महाराज
ओळ : श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त शुक्रवारी महाद्वार रोड येथील श्री गजानन महाराज भक्त मंडळाच्यावतीने साध्या पद्धतीने ‘श्रीं’च्या पादुकांची मिरवणुक काढण्यात आली. यावेळी रावसाहेब इंगवले, निशांत वाकडे, राहुल इंगवले, ऋषी इंगवले, प्रकाश मिठारी, मोहन पवार उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--