लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शिक्षण विभागाला तुटपुंजी आर्थिक तरतूद मिळाली असली तरी त्यातून नगरपालिकेच्या शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्याला यश मिळून केवळ अडीच महिन्यांच्या कालावधीत १८०० विद्यार्थी संख्येची वाढ केली. हा आनंद असल्याचे शिक्षण सभापती राजू बोंद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोरोनामुळे राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिली. नगरपालिकेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न केले. तसेच बंद पडलेल्या शाळा या अनेक खासगी शिक्षण संस्थांना भाड्याने दिल्या आहेत. त्याची मुदत संपताच त्या पुन्हा नगरपालिकेकडे घेणार आहे. माझ्या कार्यकाळात एक खोलीही कोणत्याच खासगी शाळेला दिली नाही, असेही बोंद्रे यांनी सांगितले. याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, जि. प. सदस्य राहुल आवाडे यांचे सहकार्य लाभले.