गडहिंग्लज :
कोकण व गोव्याला जाणारे पर्यटकदेखील गडहिंग्लजचा नदीघाट पाहायला येतील, अशा पद्धतीने नदीघाटाचे सुशोभीकरण करा, अशी सूचना खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी येथील नगरपालिकेला केली.
खासदार प्रा. मंडलिक यांच्या प्रयत्नाने येथील नदीघाट सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नदीघाटाची पाहणी केली.
मंडलिक म्हणाले, गडहिंग्लज नगरपालिकेने सांडपाणी व घनकचरा प्रक्रिया प्रकल्पदेखील प्राधान्याने हाती घेण्याची गरज आहे. त्याचेही प्रस्ताव पालिकेने शासनाकडे पाठवावेत.
गडहिंग्लज हे एक सुसंस्कृत शहर असून याठिकाणी चांगले वाचक आणि जाणकार रसिक मंडळी आहेत. त्यामुळे बहुउद्देशीय नाट्यगृहासाठीही नगरपालिकेने सुधारित प्रस्ताव पाठवावा. त्याच्या मंजुरीसह निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार राजेश पाटील, अॅड. सुरेश कुराडे, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, सोमगोंडा आरबोळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, अनुप पाटील, बाळासाहेब वडर, मंडल अधिकारी आप्पा कोळी, तलाठी अजयसिंह किल्लेदार आदी उपस्थित होते.
चौकट :
‘डेंग्यू’कडेही लक्ष द्या..!
‘कोरोना’प्रमाणेच ‘डेंग्यू’कडेही गांभीर्याने लक्ष द्या. घरोघरी तपासणी मोहीम राबवून डेंग्यूसदृश लक्षणाचे रुग्ण शोधून काढा आणि त्यांच्यावर वेळेत उपचार होतील, याकडे कटाक्षाने लक्ष द्या, त्यासाठीही आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
फोटो ओळी : गडहिंग्लज शहरातील हिरण्यकेशी नदीघाट परिसराची खासदार संजय मंडलिक यांनी पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील, अॅड. सुरेश कुराडे, नरेंद्र भद्रापूर, बसवराज खणगावे, विजया पांगारकर, दिनेश पारगे, नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : २९०७२०२१-गड-०६