लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भुदरगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांना जोडणारा गडहिंग्लज गारगोटी रस्ता बांधण्याची योजना १८७० साली आखण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी, बेलेवाडी आणि भुदरगड तालुक्यातील पिंपळगावच्या ग्रामस्थांनी श्रमदान करून बेलेवाडीचा घाट तयार केल्याचीही नोंद असून हा घाट नेमका कधी तयार केला याची माहिती मिळत नाही. त्या काळी श्रमदानातून ग्रामस्थांनी किती मोठे काम केले याचे हा घाट म्हणजे मोठे उदाहरण आहे.
सुरुवातीला दीडशे वर्षांपूर्वी गडहिंग्लज ते कडगाव आणि गारगोटी ते पाल असा रस्ता तयार करण्यात आला. मध्येही काही छोटे छोटे भाग तयार करण्यात आले. परंतु, चिकोत्रा नदी ते उत्तूर दरम्यान डोंगर असल्याने हा घाट रस्ता करण्यासाठी फारसे प्रयत्न सुरुवातीच्या काळात झाले नाहीत. अपवाद म्हणून १८९६ मध्ये बेलेवाडीपासून डोंगरातील दोन फर्लांग रस्ता तयार करण्यात आला. मात्र, नंतर हे काम बंद झाले.
उत्तूरपासून बेलेवाडीपर्यंतचा पावणे चार मैल लांबीचा रस्ता तयार करणे मोठे दिव्य होते. कारण जमीन कठीण होती. मोठमोठे दगड खणून काढून ते फोडून बाजूस टाकावे लागणार होते. टेकड्यांच्या बाजू तर अशा चढणीच्या होत्या की पाय टेकवण्यासही आधार नसे. मात्र, चव्हाणवाडी, बेलेवाडी आणि पिंपळगावच्या ग्रामस्थांनी कंबर कसली आणि हा घाट पूर्ण केला. सन १९०० ते १९४८ च्या दरम्यान हा घाट रस्ता तयार झाला.
चौकट
ग्रामस्थांचे प्रचंड कष्ट
हा रस्ता ज्यावेळी तयार करण्यात आला त्यावेळी या तीनही गावची एकूण लोकसंख्या फक्त २२१७ इतकी होती. अंगमेहनत करतील असे यामध्ये केवळ ८८७ प्रौढ होते. परंतु या सर्वांनी लहान, थोर, स्त्री, पुरूष असा भेद न करता झपाट्याने असे काही काम सुरू केले की सुमारे तीन मैल लांबीचा घाटरस्ता तयार केल्यानंतरच ही मंडळी स्वस्थ बसली. सार्वजनिक कामासाठी ग्रामस्थ किती आत्मियतेने त्यावेळी कार्यरत होते हे यावरून स्पष्ट होते.
चौकट
४० हजार मजुरीचे दिवस
हा रस्ता तयार करताना या सर्वांनी ४० हजार मजुरीचे दिवस यासाठी खर्च केले. ग्रामस्थांनी त्या काळाच्या वीस हजार रुपयांच्या जमिनी या रस्त्यासाठी दिल्या. ८० हजार रुपये खर्चाची अंगमेहनत या सर्वांनी केली. त्यानंतर १९४८ साली लोकल बोर्डाने हा रस्ता पक्का करण्याचे नियोजन केले. त्यानुसार गारगोटी गडहिंग्लज रस्ता अस्तित्वात आला आणि ३२ गावांची यामुळे सोय झाली. आजही जिल्ह्यातील एक प्रमुख मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. यापुढच्या काळात बेलेवाडी घाटातून जाताना निश्चितच चव्हाणवाडी, बेलेवाडी आणि पिंपळगावच्या ग्रामस्थांविषयी कृतज्ञतेची भावना मनात आल्यावाचून राहणार नाही.
०३०४२०२१ कोल गारगोटी रोड
आजरा तालुक्यातील उत्तूरहून गारगोटीकडे जाताना बेलेवाडी घाट लागतो. स्वातंत्र्यपूर्व काळात या घाटरस्त्याचे काम श्रमदानाने सुरू असल्याचे हे दुर्मीळ छायाचित्र. चव्हाणवाडी, बेलेवाडी आणि पिंपळगावच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून हा घाटरस्ता पूर्ण केला. डोक्याला मुंडासे, टोपी घातलेले, धोतर नेसलेले पुरूष आणि नऊवारी पातळ नेसलेल्या महिला या छायाचित्रात दिसत आहेत.