ऑक्सिजन निर्मितीसाठी गडहिंग्लज पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:22 AM2021-04-14T04:22:24+5:302021-04-14T04:22:24+5:30

राम मगदूम गडहिंग्लज : 'गडहिंग्लज'च्या धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. ...

Gadhinglaj pattern for oxygen production | ऑक्सिजन निर्मितीसाठी गडहिंग्लज पॅटर्न

ऑक्सिजन निर्मितीसाठी गडहिंग्लज पॅटर्न

Next

राम मगदूम

गडहिंग्लज : 'गडहिंग्लज'च्या धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प राज्यभर चर्चेत आला आहे.

गेल्या वर्षी गडहिंग्लज विभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यँत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे गडहिंग्लजचे उपजिल्हा रुग्णालय 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित करण्यात आले.

परंतु, ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडरचा प्रचंड तुटवडा होता. त्यामुळे दिवसातून दोन-तीन फेऱ्या करून कोल्हापूर, शिरोली, यड्राव व कागल येथून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करताना प्रशासनाची दमछाक व्हायची. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळातर्फे सुमारे ८० लाख रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

चेन्नई येथील 'ऑक्सएअर' या कंपनीने हा प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी हवेतील ऑक्सिजन संकलित केले जाते. त्यातील नायट्रोजन व कार्बनडाय ऑक्साईड बाजूला करून जम्बो सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून ठेवले जातात.

प्रतिदिनी १२० ते १५० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. यासाठी वीज बिला व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच, गडहिंग्लजच्या धर्तीवर संपूर्ण राज्यभर असे प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार आहे.

-------------------------

* दृष्टिक्षेपात प्रकल्प

- चेन्नई येथील 'ऑक्सएअर' कंपनीतर्फे उभारण्यात आलेला 'हवेतील ऑक्सिजन संकलित करणारा प्रकल्प.

- बांधकामासह एकूण खर्च ८० लाख.

- प्रतिदिनी क्षमता १२० ते १५० जम्बो सिलिंडरची ऑक्सिजन निर्मिती.

- वीज बिलाव्यतिरिक्त अन्य कोणताही खर्च नाही.

-------------------------

* ६० बेडना ऑक्सिजन पुरवठा

उपजिल्हा रुग्णालयातील ६० बेडपर्यंत मध्यवर्ती लाईनद्वारे ऑक्सिजन उपलब्ध करण्यात आले आहे. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला जातो.

-------------------------

*

कोट..

ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी उभारण्यात आलेला हा प्रकल्प फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवर्जून या प्रकल्पाची माहिती घेतली आहे.

- डॉ. दिलीप आंबोळे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज.

-------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : १३०४२०२१-गड-०८

Web Title: Gadhinglaj pattern for oxygen production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.