गडहिंग्लज : कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीतून विवाहितेची मोबाईलवर अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करत दीड वर्षापासून जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी तसेच तिच्या अल्पवयीन सावत्र मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. रावसाहेब बंडू पाटील (रा. अत्याळ) असे त्याचे नाव आहे. पोलिसांतील माहितीनुसार, पीडित महिला संकेश्वर मार्गावरील एका ग्रीन हाऊसमध्ये कामाला असताना रावसाहेबशी तिची ओळख झाली. दरम्यानच्या काळात तिचा पती मुंबई येथे कामानिमित्त गेल्याने रावसाहेब याने तिच्याशी जवळीक वाढवून दीड वर्षापूर्वी आजरा मार्गावरील दवाखान्याच्या पडक्या इमारतीत नेऊन मोबाईलवर तिचे अश्लील फोटो काढले. नंतर ते फोटो तिच्या पतीला दाखविण्याची भीती दाखवून तिच्यावर वेळोवेळी जबरी अत्याचार केला. आॅक्टोबर २०१४ मध्ये पीडित विवाहितेच्या अल्पवयीन सावत्र मुलीलाही रावसाहेब याने जबरदस्तीने आपल्यासोबत नेले. त्याविषयी कुठेही वाच्यता केल्यास संबंधित विवाहितेला तिचे फोटो पतीला तसेच नेटवर टाकण्याची धमकी दिली.अल्पवयीन मुलीला रावसाहेब याने आपल्या गावी अत्याळ येथे ठेवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावरही वारंवार अत्याचार केला. पीडित महिलेने गडहिंग्लज पोलिसांत रावसाहेब पाटील याच्या अत्याचाराविरोधात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके याबाबत अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
गडहिंग्लजमध्ये विवाहिता, सावत्र मुलीवर अत्याचार
By admin | Updated: July 31, 2015 01:02 IST