मलकापूर : शाहूवाडी पंचायत समितीकडे २००६ साली शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना शौचालय बांधकामाकरिता आलेले अनुदान आठ गावांतील ग्रामसेवकांनी वाटप केलेले नाही. कागदोपत्री वाटप दाखवून सुमारे १ लाख ११ हजार १०० रुपयांच्या अनुदानावर डल्ला मारला आहे. याची जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून संबंधित ग्रामसेवकांवर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी आंबा येथील सरपंच अनिल वायकूळ यांनी केली आहे.शासनाने ग्रामीण भागातील खेडी हागणदारीमुक्त करण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना ५०० रुपये व १२०० रुपयांचे अनुदान शौचालय बांधकामासाठी मंजूर केले होते. शाहूवाडी पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या १०६ ग्रामपंचायतींना गावातील लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी तातडीने निधी पाठविला होता. मात्र, आंबा, दानोळी, चाकणवाडी, तळवडे, कोपार्डे, तळेवाडी, भाडळे, आदी गावांतील ग्रामसेवकांनी लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले आहे, असा खोटा अहवाल पंचायत समितीकडे पाठविला. मात्र, संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या घराशेजारी शौचालय बांधलेले नाही.अनुदान वाटप केलेल्या यादीमध्ये त्यांची नावे आहेत, आंबा गावातील ग्रामसेवकाने अनुदान मोठ्या प्रमाणात लाटले आहे. सर्वच लाभार्थ्यांनी शौचालय न बांधता शासनाला ग्रामसेवकांनी बोगस अहवाल पाठवून कागदोपत्री ही गावे हागणदारीमुक्त झाल्याचे कळविले आहे. पंचायत समितीला निर्मलग्रामचा पुरस्कार मिळाला आहे. ज्या लाभार्थ्यांनी अनुदान घेतलेले नाही, मात्र त्यांची नावे अनुदान घेतलेल्या यादीत आहेत, अशा लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या बारा हजार रुपये अनुदानाला मुकावे लागणार आहे. संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांच्या पगारातून अनुदानाची वसुली करून गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)शासनाने या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करावी. - दत्ता पोवार, शिवसेना, तालुकाप्रमुख.जि. प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, अन्यथा शाहूवाडी पंचायत समितीसमोर आंदोलन करणार आहे. - अनिल वायकूळ, सरपंच, आंबा.शौचालय आम्ही बांधलेले नाही. पाचशे रुपयाचे अनुदान आम्हाला ग्रामसेवकाने दिलेले नाही.- राम कांबळे, लाभार्थी.
अनुदानाचे कागदोपत्री वाटप
By admin | Updated: April 7, 2015 01:32 IST