लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : किणी (ता.हातकणंगले) येथे ग्रामसेवकांस लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य प्रवीण काकासाहेब कुरणे यास पोलिसांनी सापळा रचून देंशिग (ता.कवठेमहांकाळ) येथे रात्री अटक केली.
ग्रामविकास अधिकारी विजयकुमार तुकाराम पंडित (वय ५५,रा.हिरवडे खालसा ता.करवीर) यांना २६ मार्चला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतील मुख्य संशयित प्रवीण कुरणे हा फरारी झाला होता. यास अटक न केल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी कोणत्याही परिस्थितीत सशंयितास अटक करण्याच्या सूचना सहकाऱ्यांना केल्या होत्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी, पोलीस नाईक दादा माने, प्रमोद चव्हाण यांनी कुरणे यांची शोध सुरू केली होती. कुरणे हा देशिंग येथील नातेवाइकांकडे राहत असल्यांची माहिती मिळताच स्थानिक
कवठेमहांकाळ पोलीस, देशिंग पोलीस पाटील यांच्या मदतीने कुरणे यास ताब्यात घेण्यात आला. त्यास पोलीसांनी अटक करून येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे.एस. गायकवाड यांच्या समोर हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.