जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन पाईप लिकेज
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या युनिटमधील एका सिलिंडरची पाईप लिकेज झाल्याने ऑक्सिजनची गळती झाली. मात्र या ऑक्सिजनचा दाब एवढा होता की, स्फोटसदृश आवाज आला. यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र आवाजाची तीव्रता जास्त असल्याने जिल्हा रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.
करोली (टी) येथे शेळीला पाच पिले
घाटनांद्रे (जि. सांगली) : करोली (टी) (ता. कवठेमहांकाळ) येथील पाटोळे वस्तीवरील बाळासाहेब दत्तू पाटोळे (मेजर) यांच्या शेळीने पाच पिलांना जन्म दिला. ही पाचही पिले तंदुरुस्त आहेत. सर्वसामान्यपणे एक शेळी जास्तीत जास्त तीन पिलांना जन्म देते. मात्र पाटाेळे यांच्या शेळीने पाच पिलांना जन्म दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
बागणीत बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह
बागणी (जि. सांगली) : बागणी (ता. वाळवा) येथील रोझावाडी बायपास रस्त्यालगत असलेल्या शेतामध्ये तीन महिने वय असलेल्या बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत मंगळवारी आढळून आला. सकाळी काही मजुरांना उसाच्या शेतात पाणी पाजत असताना तीन महिन्यांचे बिबट्याचे पिलू मृतावस्थेत आढळून आले. याविषयी मजुरांनी सतीश शेटे व सर्पमित्र मुरलीधर बामणे यांना याची कल्पना दिली. त्यांनी वन विभागाला कळविले. वन अधिकारी अमोल साठे व विजय मदने यांनी जागेवर पंचनामा केला. भरकटल्यामुळे हे पिलू या भागात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बिबट्याचा वावर या भागात असल्याची भीती उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी व मजुरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिसरात बिबट्याचा वावर आहे का, याची खात्री करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
वृध्दाला जिवंत जाळले : आरोपीस जन्मठेप
सातारा : एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वृध्दाला पेटवून देऊन जिवे मारल्याने सोनगाव बंगला येथील एकाला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयात सुनावण्यात आली. अंकुश दाजी चव्हाण (वय ६०) असे आरोपीचे नाव आहे. दि. १६ सप्टेंबर २०१५ रोजी सायंकाळी फलटण तालुक्यातील सोनगाव बंगला येथे अंकुश चव्हाण याने बाबासाहेब भोसले (रा. सोनगाव बंगला) या वृध्दाच्या अंगावर कॅनमधील रॉकेल ओतून पेटवून दिले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
शिरसंगीत शॉर्टसर्किटने ५० एकरमधील ऊस जळाला
आजरा (जि. कोल्हापूर) : शिरसंगी (ता. आजरा) येथे शॉर्टसर्किटने उसाच्या फडाला लागलेल्या आगीत ५० एकरामधील ऊस जळाला. आगीत ३५ ते ४० शेतकऱ्यांची उसाबरोबर पाईपलाईन, शेती अवजारेही जळाली. दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. आगीत अंदाजे २० लाखांवर नुकसान झाले आहे.