कोल्हापूर : डिसेंबर २०२० मध्ये नेमण्यात आलेल्या ३७९ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे चार महिन्यांचे थकलेले ६ कोटी रुपये मानधन सोमवारी तालुक्याला वर्ग करण्यात आले आहे. आज मंगळवारी या सर्वांच्या खात्यावर हे मानधन जमा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या ७४१ कर्मचाऱ्यांचेही दोन कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य उपकेंद्रांसाठी एक या पद्धतीने जिल्ह्यात डिसेंबर २०२० मध्ये ३७९ समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, परंतु तेव्हापासून सरासरी त्यांना मिळणारे मासिक ४० हजार रुपये मानधन असे चार महिन्यांंचे मानधन बाकी होते. त्यामुळे यातील अनेकांनी मुलाबाळांसह गेल्या पंधरवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेतली होती.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातून कोल्हापूर जिल्ह्याला नियमित निधीपैकी १४ कोटी २७ लाख उपलब्ध झाले आहेत. यातील सहा कोटी रुपये समुदाय अधिकाऱ्यांच्या मानधनासाठी, ७४१ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन कोटी रुपये, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी ८७ लाख रुपये, बाराही तालुक्याच्या विविध योजनांचे लाभार्थी, इंधन, कुटुंबकल्याण योजना यासाठी १ कोटी रुपये, सीपीआरसाठी विविध योजनांसाठी १ कोटी रुपये असा निधी वितरित करण्यात आला आहे.