कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीत संस्थापक शंकरराव पाटील-शिंगणापूरकर यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक यशवंत पॅनेलने अॅड. प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ यशवंत पॅनेलचा धुव्वा उडविला. २१ पैकी १९ जागा जिंकत सत्तांतर करण्यात पाटील गटाला यश आले असले, तरी सत्तारूढ गटाचे अॅड. प्रकाश देसाई व आनंदराव पाटील यांनी मात्र बाजी मारली. बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले पण जागांचा तिढा न सुटल्याने अखेर दुरंगी लढत झाली. २१ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात होते. रविवारी ७१.३७ टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी झाली. पहिल्यांदा साधारणत: साडेचार हजार मतांची मोजणी केली त्यामध्ये ‘संस्थापक पॅनेल’चे सर्वच उमेदवारांनी ३०० ते ३५० मतांची आघाडी घेतली. भटक्या विमुक्त जाती/जमाती गटातील संस्थापक पॅनेल’चे संभाजी नंदीवाले यांनी विजयी सलामी दिली. अनुसूचित जाती व इतर मागासगर्वीय गटातही संस्थापक पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. महिला गटात स्नेहलता शंकरराव पाटील या पहिल्यापासूनच आघाडीवर होत्या; पण राजश्री भोगांवकर व ‘सत्तारूढ’च्या विजया खाडे यांच्यात निकराची झुंज झाली. भोगांवकर या तीन मतांनी आघाडीवर असल्याचे समजताच खाडे समर्थकांनी फेरमतमोजणीची मागणी केली; पण एकत्रिकरणाच्या तक्त्यात भोगांवकर २३ मतांनी आघाडीवर असल्याने फेरमतमोजणी झालीच नाही. सर्वसाधारण गटात ‘क्रॉस व्होटिंग’ मोठ्या प्रमाणात झाल्याने मोजणीस विलंब झाला. त्यात शेवटच्या दोन फेरीत ‘सत्तारूढ’चे प्रकाश देसाई व आनंदराव पाटील यांनी पहिल्या सोळामध्ये मुसंडी मारल्याने चुरस निर्माण झाली. पाटील हे चार मतांनी विजयी झाल्याचे स्पष्ट होताच. ‘संस्थापक’ च्या राजेंद्र पाटील यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. फेरमोजणीत आनंदराव पाटील यांची सहा तर राजेंद्र पाटील यांची सात मते कमी झाली. आनंदराव पाटील हे फेरमोजणीतही पाच मतांनी विजयी झाले. कुस्तीसम्राट युवराज पाटील यांचे बंधू सर्जेराव पाटील यांनी सर्वाधिक मते घेतली. तर सत्तारूढ गटाचे नेते अॅड. प्रकाश देसाई हे नवव्या क्रमांकावर फेकले गेले.‘संस्थापक’ पॅनेलच्या विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे सहायक निबंधक सुनील धायगुडे यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, संभाजी निकम यांनी मतमोजणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. नरकेंची संगत सोडा....!करवीर तालुक्यातील एका मतपेटीत, ‘शंकररावसाहेब बँक वाढवा, करवीरची शान वाढवा, त्यासाठी नरकेंची संगत सोडा.’ अशा आशयाची चिठ्ठी सापडली. पगार घेताय मोठा, पण शाळेत कधीच नसता. ही फसवणूक नाही काय, राजकारण करून कसले समाजकारण करता? अशा कानपिचक्याही चिठ्ठीद्वारे शिक्षक संचालकांना दिल्या.बाजीराव खाडे टार्गेटकुंभी बचाव मंचचे बाजीराव खाडे (सांगरुळ) यांना बँकेच्या निवडणुकीत टार्गेट केल्याचे मताधिक्क्यांवरून स्पष्ट होते. ‘कुंभी’च्या राजकारणातील विरोधकांसह सत्तारूढ गटाने ताकदीने विरोध करूनही खाडे पाचव्या क्रमांकाने विजयी झाले.कर्मचाऱ्यांचा रोष सत्तारूढ गटाने नात्यातील नोकरभरतीस कर्मचाऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे जुने कर्मचारी सत्तारूढच्या विरोधात प्रचारात उतरले. त्याचबरोबर एक-दोन चेहरेवगळता सर्वच विद्यमान संचालकांना संधी दिल्याने सत्तारुढांचा पराभव झाला.लाज राखली!‘सत्तारूढ पॅनेल’ला सपाटून हार पत्करावी लागली; पण पॅनेलप्रमुख अॅड. प्रकाश देसाई यांच्यासह आनंदराव पाटील हे विजयी झाल्याने पॅनेलची लाज राखल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाल
संस्थापकच झाले ‘यशवंत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 01:09 IST