कोल्हापूर : माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर सरिता मोरे आज, सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितांमध्ये सायंकाळी ७ वाजता जुना बुधवार पेठेतील प्रभाग क्रमांक २९ शिपुगडे तालीम अंतर्गत हळदकर हॉल येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते प्रवेश करणार आहेत. या प्रभागातून त्यांची शिवसेनेतून उमेदवारीही जाहीर होणार आहे.
माजी महापौर सरिता मोरे यांनी गत महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत शिपुगडे तालीम प्रभाग हा प्रभाग सर्वसाधारण (खुला) झाला असल्याने त्यांचे पती माजी नगरसेवक नंदकुमार मोरे रिंगणात उतरले आहेत. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. राष्ट्रवादीमधून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ते पत्नी सरिता मोरे यांच्यासह शिवेसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीला या प्रभागात आता नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे. यावेळी उत्तरेश्वर पेठ येथील रियाज बागवान यांची शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या कोल्हापूर जिल्हा समन्वयक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार मंत्री सामंत व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे.
प्रतिक्रिया
पत्नी सरिता माेरे यांना महापौर करण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मोलाचे योगदान दिले. याचबरोबर प्रभागातील तरुण मंडळांनी या प्रभागात शिवसेनेतून निवडणूक लढावावी, असा आग्रह धरल्यामुळे शिवसेनेत प्रवेश करत आहे.
नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक