कोल्हापुरात लोकनृत्य महोत्सव; सहा राज्यांतील १०० कलाकार सहभागी
By संदीप आडनाईक | Published: September 9, 2023 01:00 PM2023-09-09T13:00:26+5:302023-09-09T13:00:45+5:30
कवठेमहाकांळच्या धनगरी गजनृत्याला टाळ्यांचा प्रतिसाद
कोल्हापूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या लोकनृत्य भारत भारती महोत्सवास शुक्रवारी पारंपरिक लोकनृत्याने प्रारंभ झाला. कोल्हापुरातील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात हा महोत्सव सुरू आहे. रविवारपर्यंत सुरू राहणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात सहा राज्यांतील शंभराहून अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील कवठेमहंकाळच्या धनगरी गजनृत्याला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.
सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांत आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत संस्कृति मंत्रालय, राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, कोल्हापूरच्या श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्यावतीने कोल्हापूरात हा महोत्सव सुरु झाला.
राजस्थानच्या सुप्रसिध्द मांगनियार लोकगीतातील गणेशवंदनाने महोत्सवात प्रारंभ झाला. यानंतर मध्य प्रदेशातील बुंदेलखंड प्रांताचे प्रसिध्द बधाई नृत्य कलाकारांनी सादर केले. पाठोपाठ छत्तीसगढ प्रदेशात स्यायिक सतनामी समाजाचे पारंपरिक पंथीनृत्य, राजस्थानच्या सपेरा जनजातीय महिलांनी सादर केलेले कालबेलिया नृत्य, महाराष्ट्रातील कवठेमहंकाळच्या धनगरी गजनृत्याला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. यानंतर ओडिसाच्या संबळपुरी नृत्य, गुुजरातचे प्रसिध्द दांडिया रास, पश्चिम बंगालच्या कलाकारांनी सादर केलेल्या छाउ नृत्यांने प्रेक्षकांची मने जिंकली.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रम सहाय्यक राजेश खडसे, सागर बगाडे, प्रमोद पाटील, चित्रकार संजय शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.