सांगली : अन्न, औषध प्रशासन विभागाच्यावतीने मागील तीन दिवस जिल्ह्यातील पंधरा दूध संस्थांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वाळवा तालुक्यातील दोन दूध संस्थांमधून पाच लाख रुपयांचे २ हजार ८७४ किलो क्रीम जप्त करण्यात आले आहे. अन्न, औषध विभागाने दि. २६ ते २८ मे या कालावधित तपासणी मोहीम राबविली होती. यामध्ये प्रामुख्याने सांगली शहरासह मिरज, वाळवा, शिराळा, खानापूर या तालुक्यातील दूध संस्थांची तपासणी करण्यात आली. तेथे असणारी साठवणुकीची प्रक्रिया तसेच परिसरातील स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शंका आलेल्या दूध, क्रीम, दही, चक्का आदींसह दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यामध्ये वाळवा तालुक्यातील दोन दूध संस्थांमधील अयोग्य प्रकारे साठवणूक केलेले क्रीम जप्त करण्यात आले. या क्रीमचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसात त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर संंबंधित दूध संस्था चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, औषध प्रशासनातर्फे सांगण्यात आली. (प्रतिनिधी)
दोन दूध संस्थांमधून पाच लाखाचे क्रीम जप्त
By admin | Updated: May 30, 2015 00:34 IST