राजाराम लोंढे - कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकत असणार्या ४९७ अनाथ विद्यार्थ्यांना चार हजार रुपये किमतीचे शैक्षणिक कीट मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने स्वनिधीतून ही नाविन्यपूर्ण योजना राबविली असून १५ जूनपूर्वी संबंधित विद्यार्थ्यांच्या हातात हे कीट मिळणार आहे. जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हणून संबोधले जाते. ग्रामीण विकासाचे केंद्र म्हणून जिल्हा परिषद काम करत असते. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद ही त्रिस्तरीय यंत्रणा खर्या अर्थाने ग्रामीण विकासाची स्रोत आहेत. पण ज्या ताकदीने या स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम करायला पाहिजे, ते होताना दिसत नाही. केवळ रस्ते, गटर्स, सौर दिवे, पाणी योजना गावात केल्या म्हणजे त्या गावाचा भौगोलिक विकास होतो. पण याच संस्थेच्या माध्यमातून सामाजिक विकास कसा करता येतो, याचे उदाहरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे यांनी संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदांना घालून दिले आहे. आई, वडील नसलेली हजारो मुले समाजात आपणाला दिसतात. आई-वडिलाचे छत्र नसणार्या मुलांची होणारी परवड आपण रोज रस्त्यांवरून जाताना, आपल्या आजू-बाजूला पाहत असतो. या मुलांसाठी काहीतरी करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने ठेवला आणि त्याच्या पूर्तताही करण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीमध्ये ४९७ विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना आई-वडील दोघेही नाहीत. नातेवाईकांकडे राहून शिक्षण घेत आहेत. या मुलांचाही इतर मुलांप्रमाणे शाळेचा पहिला दिवस नव्या कपड्यात रूबाबदार व्हावा, यासाठी त्यांना तब्बल चार हजार रुपये किमतीचे शैक्षणिक कीट दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने या नाविन्यपूर्ण योजनेसाठी स्वनिधीतून २० लाखांची तरतूद केली आहे.
पाचशे अनाथांना मिळणार शैक्षणिक कीट
By admin | Updated: May 31, 2014 01:12 IST