लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील आचार्यरत्न देशभूषण हायस्कूलसमोरील घिसाड गल्ली येथील फटाका गोडाऊनला गुरुवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून गोडाऊनच्या शेजारी असलेली पाच ते सहा घरे भक्ष्यस्थानी पडली. आगीने धारण केलेल्या रौद्ररुपात प्रांपचिक साहित्य, कपडे, सोने, रोख रक्कम असे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नसून रात्री उशीरापर्यंत घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत करण्याचे काम सुरु होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. मोलमजुरी करणाऱ्या कुटुबांच्या डोळ्यादेखत संसार उद्ध्वस्त झाले.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, देशभूषण हायस्कूलसमोर फटका विक्रीचे गोडावून आहे. या गोडाऊनला गुरुवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने बघता क्षणी रौद्र रुप धारण केले. परिसरातील पाच घरांना आगीने विळखा घातला. ही आग गोडावून शेजारी असणाऱ्या गणेश काळे, सुरेश चौगुले तसेच त्यांच्या पाठीमागे असलेल्या दस्तगीर मोमीन, जमीर पन्हाळकर, अन्सार मुल्लाणी यांच्या घरापर्यंत पोहोचली. या वेळी मुस्लिम बांधवांचा रोजा सुरु असल्याने काही मुस्लिम बांधव रस्त्यावर होते. तसेच परिसरातील रहिवाशी जागे झाले.
या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दल आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी कळविली. दलाचे जवान पोहोचेपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. दलाने महापालिका, टिंबर मार्केट, कावळा नाका, सासने मैदान, प्रतिभानगर या ठिकाणी असलेल्यापाच वाहनांना त्या ठिकाणी तत्काळ पाठविले. त्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. सुमारे पाच तास आग विझविण्यासाठी जवान कार्यरत होते. ५० हून अधिक स्थानिक रहिवाशी यांनीही बचावकार्यात सहभाग घेतला. घरातील नागरिकांना त्यांनी बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. घरातील गॅस सिलेंडर तसेच काही प्रापंचिक साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रौद्र आगीच्या पुढे तो तोकडा पडला. मुख्य अग्निशमन अधीकारी मनिष रणभिसे, स्टेशन ऑफीसर दस्तगीर मुल्ला, जयवंत खोत, कांता बांदेकर यांच्यासह सुमारे १५ ते २० जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुमारे पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ४० ते ५० लाखांचे नुकसान
दस्तगीर खुतबुद्दीन मोमनी (वय ६४) यांचे प्रापंचीक साहित्यासह ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले. गणेश काळे यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले असून यामध्ये ६ तोळे सोने, रोख रक्कम आणि प्रापंचीक साहित्याचा समावेश आहे. सुरेश चौगुले यांचे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले . यामध्ये कपडे, धान्य आणि शिलाई मशीनचे नुकसान झाले आहे. रिक्षा चालक असणाऱ्या जमीर पन्हाळकर यांचे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, घर खरेदीसाठी आणलेले रोख ७ लाख रुपये जळून खाक झाले. अन्सार मुल्लाणी यांचे ८ तोळ्यांचे दागिने वितळले आहेत. ४ ट्रक भरुन फटाकेफटाका गोडावूनला आग लागल्याची माहिती मिळताच गोडावूनचे मालक कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी गोडावून मधून ४ ट्रक भरुन फटाके बाजूला केले. शुक्रवारी सकाळी १ ट्रक भरत असताना हा ट्रक पोलिसांनी थांबवून ताब्यात घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरु होते.