n लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : बेकायदेशीरपणे खुलेआम मासेमारी करणाऱ्या नौकांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मत्स्य खात्याच्या परवाना अधिकारी रश्मी आंबोळकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्ह्यामध्ये मनाई आदेश लागू असताना मिरकरवाडा जेटी आणि साखरीनाटे बंदरात एप्रिल, मे हे दोन महिने बेकायदा पर्ससीन तसेच एलईडीने मासेमारी केली जात होती. नौकेवर ३० ते ३५ खलाशी घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जात होते. रात्रीच्या वेळेस मिरकरवाडा जेटीवर येऊन रात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मासळी उतरविण्यात येत होती. याबाबत मच्छिमार संघटनेकडून मत्स्य खात्याकडे वेळोवेळी त्याचे चित्रीकरण करून पाठविण्यात आले होते. तरीही त्याची दखल घेण्यात आली नव्हती.
या प्रकरणी रत्नागिरीचे मत्स्य खात्याचे सहाय्यक आयुक्त नागनाथ भादुले आणि परवाना अधिकारी रश्मी आंबुलकर, जे. डी. सावंत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केली होती. या पार्श्वभूमीवर आंबुलकर यांच्यावर मत्स्य खात्याकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
चौकट-
राजकीय पाठबळामुळे अधिकाऱ्यांना अभय?
बेकायदेशीर मासेमारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पारंपरिक मच्छिमारांनी अनेकदा आंदोलन करून मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ भादुले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, भादुले यांना राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर आतापर्यंत शासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आक्षेप आता मच्छिमारांकडून घेतला जात आहे. आताही केवळ परवाना अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्यात आली आहे.