कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस पथकाकडून शनिवारी दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या ११५ जणांकडून ६१ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हँडग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही नागरिक या गोष्टींचा भंग करीत आहेत. शनिवारी दिवसभरात शहराच्या विविध भागात विनामास्क १०८ लोकांकडून ५४ हजार, तर सामाजिक अंतरचे पालन न करणाऱ्या सात नागरिकांकडून ७ हजार असे एकूण ६१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट या ठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.