: संधीचे सोने करण्यासाठी गाव उतरले होते प्रचारात
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सांगरूळकरांचे आमदारकीचे स्वप्न प्रा. जयंत आसगावकर यांच्या रूपाने साकारले. तब्बल ४२ वर्षांनी आमदारकीची निवडणूक लढण्याची संधी गावाला मिळाली होती. या संधीचे सोने करण्यासाठी गट-तट विसरून सारे गाव प्रचारात उतरले होते.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून सांगरूळची जिल्ह्यात ओळख आहे. पूर्वीचा सांगरूळ मतदारसंघ असो अथवा आताचा करवीर; येथे सांगरूळ गावच नेहमी केंद्रबिंदू राहिले. सांगरूळ मतदारसंघाच्या स्थापनेवेळी १९७८ ला स्वर्गीय मारुतीराव खाडे यांनी कॉग्रेस (आय) कडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांची स्व. श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्याशी जोरदार टक्कर झाली होती. यावेळी सारा गाव एकवटला होता. स्वत:ची भाकरी पिशवीत घेऊन मारुतीराव खाडे यांच्या प्रचारासाठी लोक घराबाहेर पडले होते. त्यावेळी दळणवळणाची एवढी साधने नव्हती. मिळेल त्या वाहनातून प्रचारासाठी तरुण व वयोवृद्ध बाहेर पडले. खाडे व बोंद्रे यांच्यामध्ये निकराची झुंज होऊन अवघ्या तीन हजार मतांनी खाडे यांचा पराभव झाला. ‘सांगरूळ’च्या नावाने मतदारसंघ मात्र आमदार झाला नाही, ही खंत प्रत्येक गावकऱ्याच्या मनात होती. त्यानंतर अनपेक्षितपणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर यांना उमेदवारी मिळाली आणि सारे गाव एकवटले. आता नाही तर कधीच नाही, या ईर्ष्येने गावापासून ३००-३५० किलोमीटर दूरवर जाऊन प्रचार यंत्रणा राबवली. पै-पाहुणे, मित्रमंडळींचा शोध घेऊन आपल्या परीने एक-एक मत पदरात पाडून घेतले आणि गेली ४२ वर्षे आमदारकीकडे डोळे लावून बसलेल्या सांगरूळकरांचे स्वप्न अखेर साकारले.
- राजाराम लोंढे