कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील टोलवसुलीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे कोल्हापुरातील टोल हा तत्काळ निकाली काढण्याचा मुद्दा असल्याचे गृहीत धरून अंतिम निकाल द्यावा, अशी उच्च न्यायालयास टोलविरोधी कृती समितीच्यावतीने अॅड. युवराज नरवणकर यांनी आज, गुरुवारी केलेली विनंती न्यायमूर्ती एस. जे. वजीबदार व ए. एन. मेनन यांनी मान्य केली. न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठाकडून पुढील सुनावणीच्या तारखा मिळताच टोलप्रश्नी अंतिम सुनावणी सुरू हाईल, अशी माहिती नरवणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.सर्वोच्च न्यायालयाने टोलसंदर्भात ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयास केली आहे. कृती समितीचे वकील युवराज नरवणकर यांनी १० जूनला एका अर्जाद्वारे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तारीख निश्चित करावी म्हणून केलेल्या विनंती अर्जानुसार आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सध्या शहरात सुरळीत टोलवसुली सुरू आहे. न्यायालयाने सध्या वसुलीस स्थगिती दिली अन् त्यानंतर टोलचा निकाल आयआरबीच्या बाजूने लागल्यास कंपनीचे टोलवसुली बंद काळात मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हा प्रश्न अत्यंत तातडीने सोडविण्याचा विषय नसल्याने न्यायालयाने सवडीप्रमाणे सुनावणी घ्यावी. सर्वाेच्च न्यायालयास त्याप्रमाणे विनंती करावी, असा युुक्तिवाद आयआरबीच्या विधी तज्ज्ञांनी न्यायालयात केला.टोलवसुली बंद राहिल्यास करारानुसार कंपनीला वाढीव वेळ देण्यात येणार आहे. मात्र, आयआरबी हा निकाल जिंक ण्याची शक्यता नाही. कंपनीच्या विरोधात निकाल लागल्यास लोकांच्या पैशाचे काय? तसेच शहरात टोलनाक्यावर पोलीस तैनात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कधीही प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे टोलबाबत त्वरित निकाल द्यावा, असा युक्तिवाद अॅड. युवराज नरवणकर यांनी केला.टोलवसुली बंद राहिल्यास शासनाकडून कंपनी दंडासह वसूल करू शकेल. मात्र, वाहनधारकांचे पैसे परत करता येण्याची तरतूद नाही. यामुळे हा प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी नरेश पाटील यांच्या बेंचकडून पुढील तारखा मागून घ्या, अशी स्पष्ट सूचना न्यायालयाने केली. (प्रतिनिधी)
खंडपीठाकडून तारखा मिळताच अंतिम सुनावणी
By admin | Updated: July 18, 2014 01:00 IST