कोल्हापूर : राज्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे चित्रपट व्यवसायावर अवलंबून असलेले कलावंत, तंत्रज्ञ व कामगार कुटुंबीयांची उपासमार होणार आहे. तरी या घटकाला आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी गुरुवारी केली.
या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना पाठवले आहे. सरकारने विविध वंचित घटकांना अर्थ सहाय्य घोषित केले आहे. सर्व प्रकारचे चित्रीकरण बंद असल्याने या व्यवसायावर अवलंबून असणारे रोजंदारीवरील कलावंत, तंत्रज्ञ व कामगार यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तरी महामंडळ व शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांकडील सभासदांना विशेष आर्थिक मदत द्यावी, असे या पत्रात नमूद आहे.
---