कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत वादकाला मारहाण करताना सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा भावांनाच जमावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार रजपूतवडी (ता. करवीर) येथे शुक्रवारी सायंकाळी घडला. प्रवीण सखाराम कांबळे व राहुल कांबळे (दोघे रा. रजपूतवाडी) अशी दोघा जखमी भावांची नावे आहेत. याप्रकरणी करवीर पोलिसांनी दहा संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी : परशराम चव्हाण, रोहित चव्हाण, बंडा तळेकर, ज्ञानदेव अक्षय चव्हाण, गजानन चव्हाण, जीवन चव्हाण, कर्नल रजपूत, सूरज रजपूत, बंडा चव्हाण, अक्षय चव्हाण (सर्व रा. रजपूतवाडी).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी रजपूतवाडी येथील वीर हनुमान तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीची ट्रॉलीतून आगमन मिरवणूक सुरू होती. त्यावेळी ढोल-ताशा या पारंपरिक वाद्य पथकातील वादक सागर पोवार (रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) हा ग्रामपंचायत चौकातील झेंड्याच्या कठड्यावर चढून ढोल वाजवत होता. त्यावेळी कठड्यावर चढून ढोल का वाजवतोस असा जाब विचारत संशयित आरोपी परशराम चव्हाणसह त्याच्या सहकाऱ्यांनी वादकास मारहाण केली. त्यावेळी हा वाद सोडवण्यासाठी प्रवीण कांबळे व राहुल कांबळे हे दोेघे पुढे आले असता त्या दोघाही भावांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत प्रवीण कांबळे याने दिलेल्या तक्रारीवरून दहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.