कोल्हापूर : मुंबईतील कुपरेज मैदानावर सुरू असलेल्या महिला आयलीग पात्रता फेरी फुटबॉल स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी संघास फुटबॉल स्कूल आॅफ इंडिया (मुंबई) संघाने २-२ असे बरोबरीत रोखले.गेल्या आठवडाभरात एफसी कोल्हापूर संघाने पहिल्या दोन सामन्यांत दमदार कामगिरी करीत दोन्ही सामने जिंकले. त्यामुळे एफसी कोल्हापूरच्या महिला फुटबॉलपटूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या एफसी कोल्हापूर व फुटबॉल स्कूल आॅफ इंडिया यांच्यातील सामन्यांत एफसी कोल्हापूर संघाचा विजयाचा महामेरू रोखला गेला. यात पूर्वार्धात एफसी कोल्हापूरकडून प्रतीक्षा मिठारी हिने दहाव्या मिनिटाला एक व ४४ व्या मिनिटास दुसरा गोल नोंदवित संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली होती.
मात्र, एफएसआय मुंबईकडून पूजा धमाल व अंकिता यांनी गोलची नोंद करीत सामन्यांत २-२ अशी बरोबरी साधली. यात एफसी कोल्हापूरकडून पुन्हा आघाडी घेण्याचा प्रयत्न झाला; मात्र, त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. विशेष म्हणजे मुंबईचा एफएसआय हा संघ बलाढ्य मानला जातो. तरीही कोल्हापूरच्या नवख्या संघाने दिलेली लढत वाखाणण्यासारखी होती. बरोबरीमुळे कोल्हापूर एफसी संघाने सुपरलिग फेरी प्रवेशाकडे आगेकूच केली.