पोपट पवारकोल्हापूर : काळ्याभोर शिवारात पेरणी करूनच आषाढी वारीत तुझ्या दर्शनाला प्रत्येक वर्षी यायचो. फक्त पाऊस दे एतकंच मागणं माझ्यासह माझ्या वाडवडिलांनी तुझ्याकडे मागितलं; पण विठ्ठला, यंदा ज्या शिवारासाठी तुझ्याकडे पाऊस मागायचो ते शिवारच सरकार हडप करायला निघालंय.. ते शिवार तेवढं वाचव, अशी आर्त हाक कोल्हापूरसह शक्तिपीठ महामार्गबाधित १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी विठ्ठलाकडे केली.अवघी एक-दीड एकर जमीन, त्यावरही शक्तिपीठासाठी सरकारची नजर पडल्याने अल्पभूधारक शेतकरी हबकले आहेत. पंढरपूरला विठ्ठलाकडे साकडे घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी नामदेव पायरीजवळ उभे राहत हक्काच्या जमिनीसाठी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. दानोळीचे (ता. शिरोळ) राजगौंडा पाटील आशाळभूत नजरेने पंढरीतील नामदेव पायरीवर बसले होते. त्यांच्या इनमीन दोन एकरांतील एक एकर जमिनीवर शक्तिपीठाचा बुलडोझर फिरणार आहे. बायका-पोरांना रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही हे सांगताना रिमझिम पावसातही त्यांच्या डोळ्याच्या कडा अश्रूंनी चिंब भिजून गेल्या. वारीला नेहमी येतो, विठ्ठलाचे दर्शन घेतो. शेतशिवार चांगलं पिकू दे, हेच साकडे घालतो. मात्र, यंदा माझं शेतशिवार माझ्याकडेच राहू दे, हे मागणं मागण्यासाठी विठ्ठलाकडे आल्याचे सांगताना ६६ वर्षीय राजगौंडा याचा आवाज कातर होत गेला. सांगलीच्या किर्लोस्करवाडीचे (ता.पलूस) टी.के.सनगर हे सुजान शेतकरी. आमच्या समृद्ध शेतीची परंपरा सांगताना कधी थकत नव्हतो. मात्र, सरकार शक्तिपीठासाठी उभी दोन एकर शेती मागतंय. आमच्या कैक पिढ्या याच शेतीने जगवल्या, तुम्हीच सांगा, ही शेती दिली तर आम्ही उघड्यावर येणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिरोळ तालुक्यातील संभाजी पाटील यांनी नामदेव पायरीवरच ठिय्या मांडलेला. मी अनपड, कधी शाळेत गेलो नाही; पण प्रामाणिकपणे कष्ट करीत असल्याने काळ्या आईने साथ दिली. भाजीपाल्याच्या पिकांतून मुलांचे शिक्षण, घर, सगळं करू शकलो. आता ही काळी आईच सरकार हिसकावून घेत असेल तर आम्ही उपाणं पडलो हे सांगताना बलदंड संभाजी पाटीलही कासावीस झाले.एकवटली शक्ती सारी..पंढरीच्या वाटेवर खर्डा भाकरीकांदा-मुळा-भाजी, अवघी विठाबाई माझी.. लसूण-मिरची-कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी म्हणत शक्तिपीठ महामार्गाविरोधात विठुरायाला साकडे घालण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी पंढरीच्या मार्गावर मांजरी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे शेतातच बैठक मारत सकाळची न्याहरी उरकली. झुणका, खर्डा- भाकरी, दही, लोणचे, सोलापुरी चटणीचा आस्वाद घेत शेतकऱ्यांनी तृप्तीची ढेकर दिली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांसमवेतच या वनभोजनाचा आनंद घेतला.
Shaktipeeth Highway: अंत नका पाहू आता देवा.. जमिनीसाठी विठ्ठलाकडे धावा; शेतकऱ्यांची आर्त हाक
By पोपट केशव पवार | Updated: July 5, 2025 12:20 IST