गडहिंग्लज : भारतीय राज्यघटना जगातील आदर्श राज्यघटना आहे. व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह समाजातील गरिबालादेखील उच्चपदस्थ पदाधिकारी, अधिकारी होण्याचा हक्क घटनेमुळे प्राप्त झाला आहे. किंबहुना कायद्याच्या राज्यामुळेच देशात समानता आली आहे, असे प्रतिपादन येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.पोलीसपाटील दिनानिमित्त गडहिंग्लज तालुका पोलीसपाटील संघटनेतर्फे आयोजित पोलीसपाटील प्रशिक्षण व सेवानिवृत्त पोलीसपाटील यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. येथील पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, समाजाची प्रगती शांततेवर अवलंबून असते. सामाजिक ऋण फेडण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील म्हणाले, गावचे प्रशासन तलाठी, पोलीसपाटील, ग्रामसेवक यांनी चालवायचे आहे. पोलीसपाटील यांनी गावचे सक्षम नेतृत्व करावे.जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीसपाटलाची भूमिका महत्त्वाची आहे. भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, गडहिंग्लजचे डीवायएसपी डॉ. सागर पाटील, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, तहसीलदार हनुमंत पाटील, मुख्याधिकारी जलाज शर्मा यांचीही भाषणे झाली.याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीसपाटील जयसिंग नलवडे (हनिमनाळ), बसाप्पा पाटील (हेळेवाडी), शकुंतला कांबळे (तनवडी) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष कामगिरीबद्दल जरळीचे पोलीसपाटील विलास बागडी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. पोतदार, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए. बी. व्होडावडेकर व एस. बी. काळे, आदींसह अधिकारी व पोलीसपाटील उपस्थित होते.आनंद गवळी यांनी स्वागत व प्रास्ताविक, प्रा. प्रवीणसिंह शिलेदार यांनी सूत्रसंचालन, तर भागोजी कागिनकर यांनी आभार मानले.
देशात कायद्यामुळेच समानता : संजय देशमुख
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST