पानांपानांत विविध बिया, जनजागृतीसाठी मोफत वितरण
कोल्हापूर : काॅन्झर्व्हेशन फौंडेशन ऑफ इडियाने २०२१ या नवीन वर्षासाठी पर्यावरणपूरक कॅलेंडर
बनवले आहे असून, प्रत्येक पानांमध्ये रोपे उगवणाऱ्या बियांचा समावेश आहे. पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी संस्थेने याचे मोफत वितरण केले.
दरसाली नवीन वर्षासाठी वेगवेगळ्या प्रकारची कॅलेंडर तयार करण्यात येत असतात. त्यामध्ये निसर्गचित्रे, व्यक्ती, ऐतिहासिक वास्तू, विविध संदेश, माहिती यांचा समावेश असतो. असे कॅलेंडर महिना संपल्यावर पडून अथवा टाकली जातात. मात्र, येथील दि काॅन्झर्व्हेशन फौंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने मागील वर्षापासून पर्यावरणपूरक आगळ्यावेगळ्या कॅलेंडरची निर्मिती केली आहे. यातील प्रत्येक पृष्ठातून रोपे उगवणार आहेत.
महिना संपल्यानंतर या कॅलेंडरमधील पृष्ठांचे मातीत रोपण केल्यास त्यातून चार प्रकारची रोपे उगवणार आहेत. काॅन्झर्व्हेशन फौंडेशनने बनविलेल्या या नावीन्यपूर्ण कॅलेंडरचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ प्रा. मधुकर बाचुळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
दर तीन महिन्यांसाठी एक पान अशी चार पाने असून, त्यावर पर्यावरण संदेशही देण्यात आले आहेत. अमन मित्तल यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून अशा कागदाचा वापर जास्तीत जास्त करण्याबाबत यावेळी आवाहन केले. प्रा. मधुकर बाचुळकर यांनीही या संकल्पनेमुळे समाजात पर्यावरणाप्रती आवड निर्माण होऊन निसर्ग वाचविण्यासाठी हातभार लागणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी फौंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डाॅ. अंजली पाटील यांनी या कॅलेंडरच्या संकल्पनेविषयी माहिती दिली. याप्रसंगी चैतन्य पोतदार, विश्वजित सावंत तसेच फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते. प्रा. संजय पाठारे यांनी आभार मानले.
फोटो : 0५0१२0२१-कोल-कॉन्झर्व्हेशन फौंडेशन
फोटो ओळी : कोल्हापुरात काॅन्झर्व्हेशन फौंडेशनने बनविलेल्या पर्यावरणपूरक कॅलेंडरचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. संजय पाठारे, प्रा. मधुकर बाचुळकर, फौंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे, डाॅ. अंजली पाटील, चैतन्य पोतदार, आदी उपस्थित होते.
(संदीप आडनाईक)