कोल्हापूर : जैवविविधतेने नटलेल्या कोल्हापूरपासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी वन विभागाने प्रवेश शुल्क लागू केले आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती कोल्हापूर वन विभागाने गुरुवारी दिली. या संरक्षित वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.जैवविविधता संरक्षणासाठी राज्य वन्यजीव मंडळाच्या १८ व्या बैठकीत पन्हाळा वन परिक्षेत्रातील मसाई पठार हे ५.३४ चौरस किमी क्षेत्र ‘मसाई संवर्धन राखीव क्षेत्र’ (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) म्हणून घोषित करण्यात आले होते. मसाईसह राज्यातील १२ ठिकाणे ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित केली आहेत. त्यापूर्वी राज्यात एकूण १५ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित केली होती. मसाई पठार परिसरात समृद्ध जैवविविधता आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वन विभागाने या परिसराचे संवर्धन व्हावे, यासाठी प्रवेश शुल्क लागू करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना तसेच कॅमेऱ्यासाठीही स्वतंत्र शुल्क वन विभाग आकारत आहे. या संरक्षित वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्यास किंवा गैरप्रकार केल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
पाचगणीच्या टेबल लँडपेक्षाही विस्तीर्ण परिसरपन्हाळ्यापासून ८ किलोमीटरवर असणाऱ्या या पठारावर जाण्यासाठी बुधवार पेठ, आपटी, तुरुकवाडी, म्हाळुंगेमार्गे जावे लागते. हिरव्यागार गवताची शाल पांघरलेले हे पठार, २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले आहे. ते पाचगणीच्या पठारापेक्षाही पाचपट विस्तीर्ण आहे. याच्या एका टोकापासून दुसरे टोक ४ ते ५ किलोमीटर आहे.
असे आहे प्रवेश शुल्क
- दुचाकी वाहन : २० रुपये
- चारचाकी वाहन : ५० रुपये
- कॅमेरा : २०० रुपये
मसाई पठार हे संवर्धन राखीव क्षेत्रात येते. हे पठार जैवविविधतेने समृद्ध आहे. त्यामुळे या राखीव क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. इथल्या वन्यजीवांच्या भ्रमणमार्गाचेही रक्षण होण्यास मदत होणार आहे. - धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर