कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडावरील अतिक्रमण विनाअट व विनामोबदला पुढील दोन दिवसांत काढून घेण्याचे माऊली लॉजचे मालक अनिकेत आगळगावकर यांनी सोमवारी मान्य केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सामोपचाराने हा निर्णय घेण्यात आला.
मणिकर्णिका कुंडाच्या पश्चिमेकडील बाजूचे उत्खनन माऊली लॉजच्या अतिक्रमणामुळे थांबले होते. चार दिवसांपूर्वी देवस्थान समितीने आयुक्तांची भेट घेऊन अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. तत्पूर्वी शिवसेनेने लॉजसमोर आंदोलन केले होते. त्यानंतरही तोडगा न निघाल्याने सोमवारी देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात संयुक्त बैठक झाली. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जागा समितीची असल्याने ती आमच्या ताब्यात द्यावी, असे सांगितले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी लॉजचे मालक अनिकेत आगळगावकर यांना मंदिराच्या कामात अडथळा आणू नये, असे सांगून अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. यानंतर आगळगावकर यांनी विनाअट, विनाशर्त व विनामोबदला पुढील दोन तीन दिवसांत कुंडावरील कार्यालय व पाण्याची टाकी हे अतिक्रमण हटवण्याचे व लॉजच्या मालकीच्या जागेत स्थलांतर करण्याचे मान्य केले.
यावेळी समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, शिवसेनेचे विजय देवणे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, रमेश मस्कर, आरती नांद्रेकर, आर. डी. पाटील उपस्थित होते.
--
फोटो नं ०५०३२०२१-कोल-मणिकर्णिका बैठक ओळ : कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात सोमवारी अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मणिकर्णिका कुंडावरील अतिक्रमण हटवण्यासंबंधीची बैठक झाली. यावेळी संजय पवार यांच्यासह समितीचे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
--