कोल्हापूर : आगामी महापालिका सभागृहात महापौरपदाचे आरक्षण हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी खुले आहे. त्यामुळे याच आरक्षणासाठी असलेला राजारामपुरी-तवनाप्पा पाटणे हायस्कूल - प्रभाग चर्चेत आहे. नगरसेविका मृदुला पुरेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस), प्रतिज्ञा निल्ले (शिवसेना), माया संकपाळ (कॉँग्रेस), वैशाली पसारे (भाजप) यांच्यासह सुनीता निपाणीकर, सुवर्णा भिसे, अश्विनी पाटील हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. माजी महापौर दीपक जाधव, नगरसेवक मुरलीधर जाधव, नगरसेवक विजय सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांचा प्रभाव या प्रभागात असल्याने चुरशीची लढत होणार आहे.या प्रभागात राष्ट्रवादी-जनसुराज्यसह शिवसेना, कॉँग्रेस, धनंजय महाडिक युवा शक्तीचे मोठे गट सक्रिय आहेत. माजी महापौर दीपक जाधव यांच्या पत्नी दीपिका यांना जातीचा दाखला न मिळाल्याने त्या रिंगणातून बाहेर गेल्या आहेत. जाधव यांच्या घरातील उमेदवार नसल्याने आयत्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य शक्तीने हा प्रभाग आपल्याकडे कायम राखण्यासाठी नगरसेविका मृदुला पुरेकर यांना येथून रिंगणात उतरविले आहे. जाधव यांचे राजकीय विरोधक शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस हे जरी रिंगणात नसले, तरी त्यांनी प्रतिज्ञा निल्ले या उच्चशिक्षित उमेदवारांना उभे करून आपली ताकद पणाला लावली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून निल्ले यांचे नाव पहिल्या यादीत ठेवण्यात आले आहे.आमदार महादेवराव महाडिक व खा. धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक रहिम सनदी हे धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून या भागात सक्रिय आहेत. त्यांनी पत्नी असिया यांच्यासाठी ताराराणी आघाडी-भाजपकडून तयारी सुरू केली होती, परंतु त्यांचे नाव येथील मतदार यादीत नसल्याने त्यांच्या जागेवर भाजपकडून वैशाली अमित पसारे यांना उमेदवारी देण्यात आली. रहीम सनदी आता राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून साईक्स एक्स्टेंशन प्रभागातून निवडणूक लढवत आहेत.कॉँग्रेसच्या उमेदवार माया रामचंद्र संकपाळ यांनीही प्रचारात आघाडी घेत संपर्क सुरू ठेवला आहे. त्यांचे पती रामचंद्र संकपाळ यांचे सामाजिक काम या शिदोरीवरच त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांना माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे समर्थन, तर नगरसेवक विजय सूर्यवंशी यांचा पाठिंबा आहे. या राजकीय पक्षांच्या उमेदवारांमुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. त्यातच अपक्ष उमेदवार सुवर्णा राजेंद्र भिसे, अश्विनी पाटील, सुनीता निपाणीकर यांनीही या चुरशीत भर घातली आहे. सर्वच उमेदवारांकडून पदयात्रा, हळदी-कुंकू व वैयक्तिक भेटीगाठी या माध्यमातून आपले चिन्ह घराघरांत पोहोचविण्यासाठी प्रचार यंत्रणा गतिमान केल्याचे दिसत आहे.प्रभाग क्र. ३७
महापौरपदाच्या दृष्टीने उमेदवारांची जोरदार तयारी
By admin | Updated: October 20, 2015 00:15 IST