कोल्हापूर : जिल्ह्यातील ९ नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याचा अध्यादेश काढला असून, सोमवारपासून (दि. २३) मुख्याधिकाऱ्यांमार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत निवडणुकांना ब्रेक लागला आहे. नियमानुसार मात्र मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगरपंचायतीसाठीची निवडणूक पूर्व प्रक्रिया राबविली जाते, त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा अध्यादेश काढला असून, त्यात प्रभागरचना वेळेवर अंतिम करणे सोयीचे जावे यासाठी कच्च्या प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सोमवारपासून सुरू करण्यात येत आहे. याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काढण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यातील ९ नगरपालिकांची मुदत संपणार आहे. त्यामुळे याठिकाणी मुख्याधिकाऱ्यांमार्फत कच्ची प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. ही कार्यवाही अत्यंत गोपनीय असते. कच्ची प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यावर त्यावरील हरकती, सूचना विचारात घेऊन अंतिम रचनेला मंजुरी दिली जाते.
---
या आहेत नगरपालिका
जयसिंगपूर, इचलकरंजी, वडगाव, कुरुंदवाड, मुरगुड, कागल, गडहिंग्लज, पन्हाळा, मलकापूर. यापैकी इचलकरंजी ही अ वर्ग, जयसिंगपूर ब वर्ग व उर्वरित नगरपालिका या क वर्ग आहेत. यातील ब वर्ग व क वर्ग नगरपालिकांच्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविले जाते. अ वर्ग नगरपालिकेचा प्रस्ताव थेट निवडणूक आयोगाकडे जातो.
----
कोरोना संसर्गावरच निवडणुकीचे भवितव्य
कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत संपून वर्ष होत आले तरी कोरोना संसर्गामुळे निवडणुका घेता आलेल्या नाहीत. या ९ नगरपालिकांमध्ये मिळून जवळपास ६ लाख मतदार आहेत. पुढील काळात कोरोना संसर्ग आणि तोपर्यंत नागरिकांचे झालेले लसीकरण यावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. जिथे दोन्ही डोसचे लसीकरण किमान ६० टक्के झाले आहे तिथे निवडणुका घेतल्या जाव्यात, असा नियम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या डोसचे लसीकरण ४५ टक्के व दुसऱ्या डोसचे २३ टक्के झाले आहे. त्यामुळे आगामी काळात लसीकरणासही वेग द्यायला हवा.
--
प्रभाग रचनेची काटेकोर तपासणी
राजकीय दबावामुळे चुकीची प्रभाग रचना, क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून चुका यामुळे उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल होऊन अशा चुकीच्या प्रभाग रचनेबाबत आदेश दिले गेले आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी कच्चा आराखडा कसा व का तयार करण्यात आला, त्यात नियम व निकषांचे पालन झाले आहे का, या बाबींवर अ व ब वर्ग नगरपालिकांची प्रत्यक्ष बैठक व क वर्ग नगरपालिकांची ऑनलाइन पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे.
----