कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष कोरोनाचे खोटे कारण पुढे करीत निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यात या कालावधीत मोठ्या प्रमाणात निवडणुका सुरू असून, तुलनेत महामंडळाची सभासद संख्या व निवडणूक केंद्र कमी आहेत तरी नियमानुसार ठरलेल्या वेळेतच निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन दिले आहे. राज्यात आताच कोरोनाचे सर्व नियम पाळून ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. आताही मोठ्या प्रमाणात निवडणुका होत असताना चित्रपट महामंडळाची निवडणूक का होऊ शकत नाही, महामंडळाचे अध्यक्ष जाणीवपूर्वक निवडणूक पुढे ढकलत आहेत का याची माहिती घेण्यात यावी. महामंडळाची निवडणूक प्रक्रिया सोप्या पद्धतीची असून, मुंबई, पुणे व कोल्हापूर ही तीनच केंद्रे आहेत. सभासद संख्याही मर्यादित आहे. गेल्या काही वर्षांत महामंडळाकडून एकही वार्षिक सर्वसाधारण सभा व्यवस्थितपणे भरविण्यात आलेली नाही, संचालक मंडळाच्या बैठका होत नाहीत. तरी संचालक मंडळाची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी, त्यात वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करावी, तसेच अध्यक्षांनी पाच वर्षांचा अहवाल या सभेत ठेवावा व निवडणूक जाहीर करावी, असे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
---