कोल्हापूर : टिंबर मार्केटमधील गंजीमाळ येथे सोमवारी रात्री तलवारी, लोखंडी गज, काठ्या घेऊन वाहनांची मोडतोड, घरावर हल्ला करून आठ जणांना जखमी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी पहाटे आठ जणांना अटक केली. बंडू प्रल्हाद लोंढे (३० त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा), राजू शिवाजी जाधव (२६ रा. कनाननगर झोपडपट्टी), विशाल सुभाष लोंढ (२६ रा. जुना वाशी नाका), अतिष युवराज सकट (२६ रा. गंजीमाळ), राहुल श्यामराव चौगुले (२२, जुना गुरांचा बाजार, टिंबर मार्केट), शुभम संदीप आळवेकर (२४), अविनाश गंगाधर सुतार (२२), करण किशोर दणाणे (२२ तिघेही रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शनिवारी सायंकाळी गंजीमाळ येथील बंडू लोंढे याच्या मालकीच्या जागेत असलेले एक पक्षाचे शाखा कार्यालय फोडले होते. त्यावरून दोन्ही गटातून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी ओंकार जाधवसह चौघांना अटक केली होती. सोमवारी रात्री याच रागातून बंडू लोंढे याच्या २० ते २५ सहका-यांनी गंजीमाळ येथील ओंकार जाधव याच्या घरावर हल्ला केला. घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड कली. तसेच हल्लेखोरांनी तलवार, लोखंडी गज, काठ्यांनी केलेल्या हल्ल्यात फिर्यादी गणेश जाधव, विनोद जाधव, सचिन जाधव, संजय जाधव, अनुसया जाधव, सुरेखा जाधव, मेघा माने, सिद्धी जाधव (सर्व रा. राजाराम चौक, गंजीमाळ) हे आठ जण जखमी झाले. चारचाकी तीन वाहनांचे तर नऊ दुचाकींची मोडतोड केली. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे प्रमुख योगेश पाटील तसेच सुहास पवार यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली.