अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : १३६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा एकेकाळी शहराचा तर सध्या कळंबा, पाचगावसह उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत्र असणारा कळंबा तलाव ग्रामपंचायत प्रशासन व तलावाची निव्वळ मालकी मिरवणाऱ्या पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाने प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. वाढत्या प्रदूषणाने पाण्याचा रंग बदलला असून परिसरात पाण्याचा उग्र दर्प सुटला आहे.तलावातील पाण्याचा वापर जनावरे, गाड्या, कपडे धुणे व आंघोळीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. कात्यायनी टेकड्यांतून वाहणारे सात नैसर्गिक नाले हे तलावाचे मुख्य जलस्रोत. तलावाकाठी नागरी वस्ती वाढू नये म्हणून हे क्षेत्र ‘नो डेव्हलपमेंट व सायलेंट झोन’ घोषित केले होते पण याच पाणलोट क्षेत्रात बेकायदा नागरी वस्त्या वाढून त्यांचे प्रदूषित पाणी तलावात येत आहे.पालिका मालकीच्या कळंबा तलावाच्या हद्दीतील वीस एकर क्षेत्रांत शेतकºयांनी अतिक्रमण करत रासायनिक शेती सुरू केली आहे. शेतीतील रसायनयुक्त पाणी पावसाळ्यात जमिनीत झिरपून तलावात मिसळत आहे. तलावातील नैसर्गिक पाणी विषारी होत असतानाही लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासन मूग गिळून गप्प आहे. १३६ वर्षांत दोन वर्षांपूर्वी तलाव कोरडा पडला व जैवविविधता संपुष्टात आली. नव्याने निर्माण करण्यासाठी प्रयत्न न झाल्याने पाणी प्रदूषणात भर पडली आहेराजर्षी शाहू महाराजांच्या आॅपरेटिंग झू ट्रस्टने कुळांना कसायला दिलेल्या कात्यायनी पार्कातील जमिनीवर आज बेकायदा नागरी वस्त्या निर्माण झाल्या असून येथे शौचालये नसल्याने नैसर्गिक ओढ्यांचा वापर शौचालयासाठी केला जातो. हे मैलामिश्रीत पाणी थेट तलावात मिसळते. तलाव परिसर मद्यपि व खवय्ये लोकांच्या जेवणावळीचा अड्डा बनलाय. त्याचा घनकचरा तलावात टाकला जातो. तलाव परिसरास हॉटेलचा विळखा बसला असून त्याचाही कचरा तलाव परिसरात पसरला आहे. तलावात निर्माल्य बिनदिक्कत फेकले जात आहे. परिणामी पाण्यातील फॉस्फेटचे प्रमाण वाढून विषारी जलपर्णी फोफावत आहेत. वाढत्या प्रदूषणाने मध्यंतरी कित्येक मासे मेले होते. तर गळतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने तलावातील पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे आज तलावातून पाणीपुरवठा केंद्रात येणारे पाणी प्रचंड प्रदूषित असल्याने शुद्धिकरणावर प्रचंड खर्च सहन करावा लागतो तरीही पाण्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेतच. तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आता पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्तरित्या प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे.तलाव प्रदूषणमुक्त राहावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी तलाव काठावरील बालिंगा गाव अन्यत्र वसवले. पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी पाण्यास हात न लावता बादलीने घ्या, असा त्यांचा आदेश होता.
कळंबा तलावास प्रदूषणाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:20 IST