कोल्हापूर : पूर्वी नाटकांच्या, संगीताच्या, कुस्तीच्या तालमीत तरुणांची ऊर्जा खर्ची होत असे. सध्या संगीत, नाटक, कुस्तीचे आखाडे कमी होत गेल्याने तरुणांच्या ऊर्जेला वाट मिळणे कठीण बनले. त्यामुळे आजचा दिशाहीन तरुण ‘इसिस’सारख्या संघटनेत सहभागी होऊन देशविघातक कारवाया करत आहे. त्यांच्या ऊर्जेला योग्य वळण लावण्यासाठी सर्वच क्षेत्रांतील आखाडे चालू राहायला हवेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी व अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी येथे केले. गायन समाज देवल क्लबमधील नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे ‘गोविंदराव टेंबे रंगमंदिर’ असे नामकरण नाना पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली व गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक व्ही. बी. पाटील, घाटगे-पाटील इंडस्ट्रिजचे किरण पाटील उपस्थित होते. यावेळी रसिक प्रेक्षकांनी सभागृह खचाखच भरले होते. गोविंदराव टेंबे यांच्या समग्र कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘गुणी गोविंद’ हा पंडित सुधीर पोटे प्रस्तुत विशेष सांगीतिक कार्यक्रम झाला. अभिनेते पाटेकर म्हणाले, रंगमंचाची खासियत म्हणजे इथे उभ्या असलेल्या माणसाला कोणी जात विचारत नाही. अभिनय, गायकी, चित्र अशा कलांनी त्या माणासाला ओळखले जाते. सर्वांत सेक्युलर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे कला. कॅमेरा जात-धर्म पाहून कोणाचं चित्रीकरण करायचं, कोणाचं नाही हे ठरवत नाही. तो तटस्थपणे चित्रण करतो. रंगमंच हा भारावून टाकणारा चौकोन असतो. इथे आलं की, पवित्र, सुंदर वाटतं. आम्ही रंगमंचावरील उजेडात उभे राहून अंधारात बसलेल्या प्रेक्षकांत समाधान शोधतो. पुन्हा जन्म मिळाला, तर कलाकारच व्हायला आवडेल.’ आमोणकर म्हणाल्या, मी लहान असताना देवल क्लबला गायल्याचे पुसटसे आठवते. इथे पुन्हा आल्याने आनंद झाला. भारताची दैवी शास्त्रीय संगीताची परंपरा देवल क्लबने जपली आहे. देवल क्लबने शास्त्रीय संगीताची परंपरा जगभर पोहोचवावी. ज्योत्स्ना टेंबे-खांडेकर म्हणाल्या, टेंबे कुटुंबीयांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. वडिलांची इच्छा होती, आजोबांसाठी काहीतरी करावे, पण ते त्यांना जमले नाही. वडिलांची स्वप्नपूर्ती व माझी वचनपूर्ती या निमित्ताने होत आहे. व्ही. बी. पाटील म्हणाले, ‘या रंगमंचासाठी राज्य शासनाची मदत अपुरी पडली. परंतू नाना पाटेकर व समाजातील अनेक व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली म्हणून ५५० आसनक्षमतेचे सभागृह पूर्ण झाले आहे.’ यावेळी उपेंद्र कारखानीस यांनी टेंबे यांच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचलन मनीष आपटे यांनी केले. प्रास्ताविक श्रीकांत डिग्रजकर यांनी केले. उद्योजक किरण पाटील, देवल क्लबचे कार्यवाह अरुण डोंगरे, दिलीप गुणे, आदी उपस्थित होते.
ऊर्जेला वाट न मिळाल्याने तरुण बनला विघातक
By admin | Updated: January 3, 2016 00:57 IST