कोल्हापूर : येथील अंबाबाई, जोतिबा मंदिरात भाविकांसाठी आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करत भाविकांना सुचनाचे पालक करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. सुट्टी अन् सणासुदीच्या काळात राज्यभरातील भाविक अंबाबाई, जोतिबाच्या दर्शनासाठी येत असतात. याआधी भाविक जीन्स अन् वेगवेगळा पेहराव करुन मंदिरात प्रवेश करत होते. मात्र यापुढे तोकडे कपडे न घालता, पारंपारीक पध्दतीने कपडे परिधान करावे लागणार आहेत.देवस्थान समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, करवीर निवासिनी अंबाबाई/महालक्ष्मी देवस्थान तसेच केदारलिंग (जोतिबा) देवस्थान वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा पर्व काही भाविक दर्शनासाठी येताना तोकडे कपडे परिधान करुन मंदिरामध्ये प्रवेश करतात, काही मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांसाठी ड्रेसकोड करणेत आलेला आहे. करवीर निवासिनी देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठा पैकी एक शक्तीपीठ असून या मंदिराचे महत्व फार आहे. तरी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनास तसेच धार्मिक विधीच्या अनुषंगाने येताना तोकडे कपडे न घालता, पारंपारीक पध्दतीने कपडे परिधान करावे, मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर करुन व त्याचे पालन करुन पुरुष व महिला भक्तांनी कपडे परिधान करावे आणि सुचनाचे पालन करुन देवस्थान व्यवस्थापन समितीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू, तोकडे कपडे घालून येण्यास मनाई
By भारत चव्हाण | Updated: May 13, 2025 13:18 IST